जनसंघर्ष न्यूज स्पेशल रिपोर्ट
हो होय, तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले हे 1876 ते 1883 पर्यंत पुण्याच्या स्थानिक नगरपालिकेचे कौन्सिलर, आजच्या भाषेत ब्रिटिश सरकार नियुक्त नगरसेवक होते. जेव्हा पुण्यामध्ये 17 फेब्रुवारी 1882 रोजी जनगणना झाली. जेव्हा पुणे जिल्ह्यातील तीन लाख 96 हजार 587 इतके कुणबी असून 52 हजार पाचशे सत्तावीस माळी असल्याची नोंद केली गेली. तेव्हा पुण्यातील नित्याच्या सेंसेसच्या कामामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे नेहमीच मोठे मार्गदर्शन राहिले होते.
त्यावेळी रावसाहेब नरसो रामचंद्र या नावाचे गृहस्थ पुणे नगरपालिकेचे सचिव होते. जनगणनेची जबाबदारी ब्रिटिश सरकारने डब्ल्यू एम फ्लेचर नावाच्या सुप्रीडेंट ऑफ रेवेन्यू सर्वे या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सोपविली होती. तेव्हा पुणे कॅन्टोन्मेंटचे मॅजिस्ट्रेट एच इ विंटर होते. त्या तिघांवर निर्दोष जनगणना पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली गेली होती. नगरपालिकेचे सदस्य असल्याने महात्मा फुले यांचा रावसाहेब नरसोसह सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते.पुणे जिल्ह्याची जनगणना जाहीर करण्यापूर्वी तिचा ड्राफ्ट ब्रिटिशांनी घोषित केला.त्यावर आक्षेप मागविले. काही महिन्यांची मुदत दिली. हे सारे काम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साक्षीने झाले होते.
महात्मा फुले यांचे मूळ गाव व सासुरवाडी असलेल्या सातारा जिल्ह्यासह ब्रिटिशांनी देशभर जनगणनेचे व्यापक काम एकाच दिवशी पार पाडले होते. तेव्हा सातारा व पुणे जिल्ह्यातील सर्व मराठा हे कुणबी असल्याची ब्रिटिश सरकारने नोंद केली आहे. इतकेच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या गॅजेटच्या पहिल्या व्हॉल्युमच्या शेवटच्या विभागातील इंडेक्समध्ये पान नंबर 572 वर मराठा या शब्दासमोर see kunbis असे स्पष्ट लिहिले आहे. तसेच कुणबी म्हणजे कोण व कसे त्यांच्या चालीरीती काय याचे वर्णन ब्रिटिश सरकारने पान क्रमांक 284 पासून ते 309 पर्यंत 25 पाने भरून केले आहे .
तेव्हाची बॉम्बे_प्रेसिडेन्सी, सीपी आणि बेरर, सेंट्रल प्रोव्हिसेस, तसेच निजाम डॉमिनियन म्हणजेच आजच्या महाराष्ट्रात व तेव्हाच्या तेलंगणात एकूण मराठ्यांपैकी सुमारे 82 टक्के मराठ्यांच्या नोंदी ह्या कुणबी अशाच केल्या गेल्या होत्या. त्या नोंदी सलग निर्वीघ्नपणे 45 वर्षे तशाच चालू होत्या.. त्यानंतर मात्र इंग्रजीतून तेलगू व मराठीमध्ये री रायटिंग करताना पुढे बरेच बदल होत गेले.
बहुतांशी सर्व मराठा समाज हा कास्तकार, कुणबी, इंग्रजांच्या शुद्ध इंग्रजीमध्ये husbandmen, प्रत्येक जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये हजबंडमेन म्हणजेच पशुपालक व शेती उद्योग करणारे व त्याखाली कुणबी किंवा तेलंगणात अनेक ठिकाणी कापू अशीच नोंद घेतली गेली आहे.
जेव्हा पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीचा लढा उभारला होता. तेव्हाच्या ब्राह्मण व अन्य उच्च जातींचे पदोपदी नाव घेऊन व त्यांना लक्ष करून चळवळी केल्या होत्या. तेव्हा माळी समाजाची संख्या खूप कमी होती. त्या सामाजिक चळवळीच्या लढ्यात या भूमीतील कुणबीच उघड्या छातीने रस्त्यावर उतरले होते.स्वातंत्र्यानंतर मात्र पुरोगामी महाराष्ट्र आंधळा झाला.त्याने डोळस होऊन त्या वस्तुस्थितीकडे नीट पहावे.
आताचा मुद्दा हा राजकीय नव्हे तर सामाजिक संघर्षाचा व दुःखाचा आहे याची नोंद सर्वांनी ठेवावी. निवडणुका येतील आणि जातील पण गोरगरिबांची जर डोकी फुटली तर त्यांना टाके देणे खूप मुश्किल होऊन जाईल.
शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची नावे घेऊन, त्यांच्याच बहुसंख्येने गरीब व वंचित असलेल्या बहुजनाला तुडवण्याचा उद्योग कोणी करू नये असे मला मनापासून वाटते.
तत्कालीन महाराष्ट्र व तेलंगणा म्हणजेच आजचा मराठवाड्यामध्ये 80 ते 82 टक्के कुणबीच कसे होते याची जिल्हावार व सुमारे 50 वर्षाची आकडेवारी माझ्याजवळ आहे. निजामाने व ब्रिटिशांनी त्या काळातील कुणब्यांचे वर्णन करणाऱ्या ज्या नोंदी केल्या आहेत. ज्याची तीन-चारशे पाने भरतील. त्या वाचताना आजही कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
ही सर्व आकडेवारी न्यायालयामध्ये, संसदेत किंवा महाराष्ट्राच्या असेंबलीमध्ये सुद्धा कधीही गांभीर्याने मांडली गेलेली नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. हा तथाकथित पुरोगामी महाराष्ट्र डोळस व्हावा एवढी या भूमीतील एक साहित्यिक म्हणून माझी इच्छा आहे. मी कधीच जातीयवादी नव्हतो. भाऊसाहेब पेशव्यांना पानिपतात नायक बनवले म्हणून मी मराठ्यांच्याही शिव्या खाल्ल्या आहेत. झाडाझडतीचा माझा नायक खैरमोडे मास्तर हे तर #दलित होते. तेव्हाही अनेकांच्या रोशाला मी बळी पडलो आहे. आताच्या सामाजिक जखमेवर शांतपणे योग्य ती दवा सर्वांनीच शोधावी. ती चिघळून देणे कोणाच्याही हिताचे नाही. बा तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रा तू लवकर डोळस हो.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोरारजीच्या डमडमच्या गोळ्या छातीवर झेलून बळी पडलेल्या 106 हुतात्म्यापैकी 76 जी कुणब्यांची पोरं होती. त्यांच्या आत्म्याची सुद्धा हीच इच्छा असेल हो.–विश्वास पाटील
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 142