जनसंघर्ष न्युज नेटवर्क
बारामती – पराक्रम्य संलेख अधिनियम १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दाखल झालेल्या ₹१० लाखांच्या धनादेश वटवणी न झाल्याच्या प्रकरणात बारामती न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथील सौरभ छगन नांदगुडे (वय २७) यांना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात फिर्यादी म्हणून त्याच गावातील सचिन अंकुश झेंडे (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केली होती. नांदगुडे यांनी घरगुती व शैक्षणिक कारणांसाठी झेंडे यांच्याकडून ₹१० लाख रक्कम उधार घेतली होती. त्यासाठी त्यांनी दोन धनादेश प्रत्येकी ₹५ लाख असे दिले होते. मात्र हे धनादेश बँकेत सादर केल्यानंतर “Drawer’s Signature Differs” या कारणावरून परत आले.
फिर्यादीने त्यानंतर कायदेशीर नोटीस पाठवूनही आरोपीने रक्कम परत केली नाही. अखेरीस झेंडे यांनी न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग प्रशांत पी. काळे यांच्या न्यायालयात झाली.
सुनावणीदरम्यान आरोपीने “चेकवरील सही माझी नाही, फिर्यादीच्या पत्नीने चेक पळवून खोटी सही केली” असा बचाव केला. मात्र आरोपीने आपल्या दाव्याचे कोणतेही ठोस पुरावे, तज्ञ साक्ष किंवा पोलिस तक्रार सादर केली नाही. न्यायालयाने हा बचाव अविश्वसनीय ठरवत फिर्यादीच्या बाजूने निर्णय दिला.
न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, “आरोपीकडे पुरावे नसल्याने त्याचा बचाव विश्वासार्ह ठरत नाही. धनादेश हा कायदेशीर देणे फेडण्यासाठीच दिला गेला होता.”
या निर्णयामुळे पराक्रम्य संलेख कायद्यांतर्गत देणी फेडण्यात निष्काळजीपणा करणाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला असल्याची प्रतिक्रिया कायदेवर्तुळातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अशा धनादेश फसवणुक प्रकरणांमध्ये न्यायालयाने एक प्रकारचा निर्वाणीचा संदेश दिल्याचे यामधुन दिसत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 5,177









