जनसंघर्ष न्युज नेटवर्क
फलटण, दि. २८ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनं संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने तब्बल दोन दिवस बेपत्ता राहिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या दोन दिवसांत नेमकं कोण त्याला वाचवत होतं? आणि त्या ४८ तासांत तो कुठे होता? या प्रश्नांची उत्तरं आजही गूढच म्हणून राहिलेली आहेत.
गुरुवारी भाऊबीजेच्या दिवशी डॉ. मुंडे यांनी फलटण शहरातील हॉटेल मधुवीरच्या रूम क्रमांक ११४ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की, “माझ्या मृत्यूसाठी पीएसआय गोपाळ बदने हाच जबाबदार आहे. त्याने माझ्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला.” या उघड कबुलीनंतर पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
मात्र, या घटनेनंतर बदने अचानक गायब झाला. फलटण पोलीस त्याचा शोध घेत होते, परंतु तो तब्बल दोन दिवस पोलीसच्या नजरेआड राहिला. शेवटी शनिवारी तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. तो कुठे लपला होता, त्याने मोबाईल स्विच ऑफ का केला, आणि त्याला माहिती कोण देत होतं? — या सर्व बाबींची उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
या प्रकरणानंतर बदनेच्या वादग्रस्त कारकिर्दीचे नवीन गौप्यस्फोट आता होऊ लागले आहेत. बदने मूळचा बीड जिल्ह्याचा असून, आधी तो पोलीस कॉन्स्टेबल होता. परीक्षा देऊन तो पीएसआय झाला. सातारा जिल्ह्यात बदली झाल्यानंतर त्याने उसतोड कामगारांवर दबाव, गैरवर्तन आणि मारहाणीचे प्रकार केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. डॉ. संपदा मुंडे या बीड जिल्ह्याच्या असल्याने, त्यांच्याकडे फिट सर्टिफिकेट देण्यासाठीही दबाव आणल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात रंगली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी फलटण पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सीडीआर आणि व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे. “या ४८ तासांत बदनेला कोणी- कोणी मदत केली याचा संपूर्ण खुलासा व्हावा,” अशी मागणी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच याचा तपास स्वःता हाती घ्यावा, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील एका गावात बदनेला स्थानिक नागरिकांनी झापल्याची व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मार्च महिन्यातील ही घटना असून, बदने रात्री एका साखर कारखान्याच्या वसुलीसाठी गावात गेला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला “रात्री चोरासारखे का आलात?” असा सवाल केला होता.
या घटनेनंतर एक महत्त्वाची बाब समोर आली आहे — डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वीच डीवायएसपी कार्यालयात अर्ज दाखल करून बदने व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या अर्जाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. जर वेळेत कार्यवाही झाली असती, तर कदाचित हा दुर्दैवी प्रकार टळला असता, असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत आहे.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बदनेला अटक करण्यासाठी प्रचंड दबाव असल्याचे सांगितले जात आहे. तरीही, बदनेने पोलिस शोध चुकवत रिक्षाने थेट फलटण पोलीस ठाणे कसे गाठले, हा प्रश्न ही अजुन अनुत्तरितच आहे.
राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक संघटनांतून आता एकच मागणी जोर धरत आहे —
“रक्षकच भक्षक बनले, तर न्याय कोण देणार?”
डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील हे ‘गायब’ ४८ तासांचे गूढ उकलणेच आता पोलिस विभागाच्या पारदर्शकतेची खरी कसोटी ठरणार आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह










