रेशीम उद्योग विस्तारासाठी म्हसोबावाडीत एकदिवसीय चर्चासत्र यशस्वी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

म्हसोबाचीवाडीत रेशीम उत्पादनावर मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रेशीम उद्योगाच्या प्रगतीसाठी गटशेती व तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक – डॉ. ढवळे
इंदापूर, ता. २७ : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे शनिवार (ता. २५) रोजी एकदिवसीय रेशीम उत्पादन चर्चासत्र उत्साहात पार पडले. रेशीम उत्पादन क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, कीटक संगोपन, तसेच तुती बाग व्यवस्थापन या विषयांवर सखोल चर्चा झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी भूषविले. प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, तसेच पुणे जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले प्रमुख पाहुणे तर, म्हसोबावाडी गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
या चर्चासत्रात म्हसोबावाडी परिसरातील ४६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. रेशीम उत्पादक शेतकरी मनोज चांदगुडे यांनी सांगितले की, “सुरुवातीला केवळ दोन-तीन शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा उद्योग आज १२५ शेतकऱ्यांपर्यंत विस्तारला आहे. शासनाच्या योजनांमुळे आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे रेशीम उद्योगाला नवीन बळ मिळाले आहे.” चॉकी सेंटरचे अजिंक्य कांबळे यांनी सेंटरच्या कार्यपद्धती आणि रेशीम शेतीतील योगदान स्पष्ट केले.
शेतकरी आबासाहेब सांगळे यांनी तुतीच्या झाडांच्या वाढीसाठी गोमूत्र आणि सेंद्रिय खतांचा वापर उपयुक्त ठरल्याचे सांगितले. तर बारामतीचे शेतकरी अतुल घाडगे यांनी कीटक संगोपन गृहातील तापमान आणि आर्द्रता नियंत्रणासाठी एच.ओ. तंत्रज्ञान कसे फायदेशीर ठरते, याचे प्रत्यक्ष उदाहरण दिले.
डॉ. महेंद्र ढवळे यांनी तुती बागेचे योग्य व्यवस्थापन, कीटक संगोपन, रोग व किडींचे नियंत्रण, खत व्यवस्थापन, तसेच कोश बाजारपेठ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी स्वप्नील चांदगुडे यांच्या तुती बाग आणि कीटक संगोपन गृहाला भेट देत उझी माशी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवले. रेशीम शेतीत गटशेतीचा अवलंब आणि पीक विम्याचा समावेश करण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज चांदगुडे यांनी केले तर अण्णासाहेब चांदगुडे यांनी आभार मानले. या चर्चासत्रामुळे म्हसोबाचीवाडी परिसरातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योगात नव्या संधींचे दालन खुले झाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!