जनसंघर्ष न्युज नेटवर्क
फलटण, ता.२४ : सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे (वय 32) यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेने फलटणसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहून दोन पोलिस अधिकाऱ्यांवर थेट अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये PSI गोपाल बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना आपल्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. “या दोघांकडून मला सातत्याने छळ आणि मानसिक अत्याचार सहन करावे लागत आहेत,” असं त्यांनी नमूद केलं आहे. परिणामी पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून, जिल्हा पोलिस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, गेल्या काही महिन्यांपासून डॉ. मुंडे आणि पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू होता. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणातून निर्माण झालेला गैरसमज वाढत गेला आणि या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीत सततचा मानसिक ताण आणि दबाव यामुळे डॉ. मुंडे यांनी अखेर टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉ. मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र चौकशीसाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आलं आहे.
दरम्यान, एका तरुण महिला डॉक्टरने पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर येताच वैद्यकीय वर्तुळात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या संघटनांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने पोलिस यंत्रणेच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिल्याने जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 4,692









