जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.३१ : मौजे निरगुडे (ता. इंदापूर) या गावात कायमस्वरूपी व पूर्णवेळ तलाठी नियुक्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. गावातील खातेदारांची कामे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून, याचं पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे यांनी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, मौजे निरगुडे हे इंदापूर तालुक्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे. या गावातील शेती क्षेत्र मोठे असून, खातेदारांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. अशा परिस्थितीत गावाकरिता स्वतंत्र तलाठी कार्यालय अस्तित्वात असले तरी, अद्यापही प्रशासनाकडून कायमस्वरूपी व पूर्णवेळ तलाठी नेमण्यात आलेला नाही. परिणामी, जमीन नोंदी, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, पीक नोंदी अशा महत्त्वाच्या कामांचा तगादा लागला आहे.
यामुळे शेतकरी व नागरिकांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत असून, सरकारी योजनांपासून लाभ घेण्यातही अनेकांना विलंब होत आहे. गावातील नागरिकांचा संयम आता संपत आल्याचे खारतोडे यांनी सांगितले.
“प्रशासनाने दिनांक 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मौजे निरगुडे गावा करिता पूर्णवेळ तलाठी नियुक्तीचा आदेश काढावा. अन्यथा दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. तरीदेखील न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा देखील भगवान खारतोडे यांनी दिला आहे.
ही बाब ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून, खारतोडे यांच्या भूमिकेला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. गावातील वरिष्ठ नागरिक, शेतकरी व युवक वर्गाकडून प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
👉दरम्यान, स्थानिक प्रशासनाने या निवेदनाची नोंद घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी, अधिकृत आदेशाबाबत अद्याप स्पष्टता नाही. येत्या काही दिवसांत या मागणीबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण जनतेच्या मूलभूत मागण्यांकडे प्रशासनानं तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे; अन्यथा संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 6,204









