अंबिका माता यात्रेनिमित्त शिरवळ सज्ज ; शिवमोहत्सव,छबिना, कुस्त्या व तमाशाचा जल्लोष

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
सातारा, ता.१४ — अक्षय तृतीया निमित्त शिरवळ ता.खंडाळा येथे श्री अंबिका देवीची पारंपरिक यात्रा यंदाही उत्साहात आणि दिमाखात साजरी होणार असून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांनी यात्रेची रंगत अधिकच वाढणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि मनोरंजनाचा संगम ठरणार आहे.

यात्रेचा शुभारंभ शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ‘कमानपीरबाबा संदल’ या धार्मिक कार्यक्रमाने होणार आहे. सायं. ७ ते ९ या वेळेत पार पडणाऱ्या या कार्यक्रमानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून गावातील प्रमुख मार्गांवरून ती फिरणार आहे. या मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ‘शिवमहोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात धार्मिक वातावरणासह विविध पारंपरिक सादरीकरणांचा समावेश राहणार आहे.
रविवार, दि. १९ एप्रिल हा दिवस यात्रेतील प्रमुख आकर्षणांचा दिवस ठरणार आहे. दुपारी १२ वाजता श्री अंबिका देवीच्या शासन काठीचे भव्य स्वागत करण्यात येणार असून गावात उत्सवी वातावरण निर्माण होणार आहे. त्यानंतर रात्री छबिना सोहळा पार पडणार आहे. या छबिन्यात ढोल-लेझीम पथकांचे सादरीकरण, पारंपरिक खेळ आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील खेळाडूंनी या छबिन्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सोमवार, दि. २० एप्रिल रोजी यात्रेची रंगत अधिकच वाढणार आहे. सकाळी १० वाजता मंगला बनसोडे व नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार असून शिरवळ गावचे प्रथम सरपंच कै. पांडुरंग (भाऊ) तांबे यांच्या स्मरणार्थ पाच स्मृती चषक देण्यात येणार आहेत. कुस्तीप्रेमींसाठी हा विशेष आकर्षणाचा भाग ठरणार आहे. रात्री ९ वाजता वसंत नांदवळकर सह रविंद्र पिंपळे यांच्या नामांकित तमाशाने रसिकांचे मनोरंजन होणार आहे.
यात्रेच्या निमित्ताने गुरुवार, दि. २३ एप्रिल तसेच रविवार, दि. २६ एप्रिल रोजी ‘मायबोली महाराष्ट्राची लोकधारा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ऐश्वर्या जाधव यांचा बहुप्रसिद्ध गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार असून रसिकांना सुरेल संगीताचा आनंद घेता येणार आहे.
तमाशा कार्यक्रम एस.टी. स्टँड मैदान आणि दत्त मंदिर परिसरात पार पडणार असून कुस्त्या आणि ऑर्केस्ट्राचे आयोजन ज्ञानसंवर्धनी प्रशाळा मैदानावर करण्यात आले आहे.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी,यात्रा कमिटी, संयोजक मंडळ व ग्रामस्थांनी व्यापक तयारी केली आहे. यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!