कृषीमंत्री भरणेंकडून शेतकऱ्याची थट्टा? व्हायरल व्हिडिओमुळे संतापाची लाट; राज्यभर चर्चेला उधाण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क | इंदापूर | ता. ११ जून
इंदापूर तालुक्यातील पाणीटंचाई आणि ऊस पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एका शेतकऱ्यासोबत झालेला संवाद सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामधील काही वक्तव्यांवरून कृषिमंत्री भरणे यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
खडकवासला कालव्याचे पाणी वेळेत न मिळाल्याने कळस पट्ट्यासह इंदापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच संदर्भात एका शेतकऱ्याने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र या भेटीदरम्यान झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी आपले नुकसान सांगत असताना कृषिमंत्री भरणे यांनी, “माझ्याकडे नाही तुमचं… मी साधा माणूस आहे. गरीब माणूस आहे. तुम्ही मोठी माणसं आहात,” असे वक्तव्य केल्याचे ऐकू येत आहे. या वक्तव्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, सामाजिक माध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे.
संवादादरम्यान संबंधित शेतकऱ्याने, “मामा, तुम्ही शब्द दिला होता,” अशी आठवण करून दिली. त्यावर मंत्री भरणे यांनी, “मी कोणताही शब्द दिला नव्हता. ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले त्यांच्याकडे जा,” अशा आशयाचे उत्तर दिल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यामुळे आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी २५ मे रोजी इंदापूर येथील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. दोन ते तीन जूनदरम्यान पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्याची चेष्टा केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. संबंधित शेतकरी हा आपला परिचित आणि नातेवाईक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला. तसेच खडकवासला कालव्याचे पाणी अखेर इंदापूरपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे आधीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गाच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी किती संवेदनशील आहेत, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल व्हिडिओनंतर कृषिमंत्री भरणे यांच्याविरोधात शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
— संपादक : संजय चांदगुडे
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क : ७५८८६२२३६३
बुलंद आवाज जनतेचा | सत्याचा संघर्ष जनसंघर्ष
Website : jansangharshnews.com |
Digital E-Paper
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!