जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
“नसरापूर ! पोक्सोतील आरोपीच ठरला नराधम; पोलिसांच्या निष्काळजीपणाने सुटला आणि घेतला चिमुरडीचा बळी”
“गोठ्यात नेऊन अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; मृतदेह शेणात लपवला — गावकऱ्यांचा संताप अनावर”
भोर, ता.३ : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे उघडकीस आलेल्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाचं, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी यापूर्वीही पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्ह्यात अटक झालेला होता, मात्र पोलिसांच्या निष्काळजी तपासामुळेचं तो सहज सुटल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपीने “गायी दाखवतो” असा बहाणा करून चिमुरडीला गुरांच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अमानुष अत्याचार केल्यानंतर तिची ओळख उघड होऊ नये म्हणून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. एवढ्यावरही न थांबता, गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह गोठ्यातील शेणात पुरून ठेवण्यात आला.
चिमुरडी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. संशयाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढत पंचनामा करून, पुढील प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला.
मात्र या प्रकरणात सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे, हा आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात अडकला होता. स्थानिकांच्या मते, नसरापूर परिसरात याआधीही अशा दोन घटना घडल्या होत्या, मात्र त्यावेळी तपासात त्रुटी राहिल्याने आरोपीला शिक्षा झाली नाही. यामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
घटनेनंतर नसरापूर आणि भोर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवरचं गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “जर आधीच्या गुन्ह्यात ठोस कारवाई झाली असती, तर आज ही चिमुरडी जिवंत असती,” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आरोपीवर कठोर कलमांखाली पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 100,151









