बारामतीत ‘सुनेत्रा लाट’; विरोधकांचा पूर्णतः धुव्वा, २ लाख १९ हजार मतांनी विजयी.!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
बारामती, ता.४: राज्याच्या राजकारणात निर्णायक मानल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व असा विजय संपादन करत इतिहास रचला आहे. तब्बल २ लाख १८ हजार ९३० इतक्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवत केवळ प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला नाही, तर राज्यातील निवडणूक विक्रमांनाही मागे टाकले आहे.
बारामती हा पवार कुटुंबाचा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघातून दिवंगत अजित पवार यांनी यापूर्वी १ लाख ६५ हजार मताधिक्याचा विक्रम नोंदवला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आजच्या निकालात हा विक्रम सहजपणे मोडीत काढत नवा इतिहास प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या विजयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि चर्चा दोन्ही रंगल्या आहेत.
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच बारामतीची लढत एक तर्फी पाहायला मिळाली होती. मात्र, मतदानाच्या टप्प्यानंतर सुध्दा महायुतीच्या बाजूने स्पष्ट कल दिसू लागला होता. निकालाच्या दिवशीही सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवत एकतर्फी विजय मिळवला.
या निकालामुळे महायुतीला मोठा राजकीय बूस्ट मिळाला असून, आगामी निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. विशेष म्हणजे, पोटनिवडणुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी होणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत.
दरम्यान, या विजयाचा जल्लोष बारामतीत सर्वत्र पाहायला मिळाला. समर्थकांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. दुसरीकडे, विरोधकांचे या निकालामुळे डिपॉझिट जप्त झाल्याने मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.
बारामतीच्या या निकालाने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!