जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
भोर,ता.२८ — पुणे बेंगलोर मार्ग बनला वसुलीचा अड्डा, पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सारोळा (ता.भोर ) येथील उड्डाण पुलावर बसविण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पुलाच्या उतारावरच ६० किमी प्रतितास वेगमर्यादा ठेवून कॅमेरा बसविण्यात आल्याने दररोज हजारो वाहनचालक दंडाच्या जाळ्यात अडकणार असल्याची तक्रार होत आहे.
पुण्याकडून सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच बेंगलोर कडे जाणारी वाहतूक या मार्गावर मोठ्या प्रमाणावर असते. उड्डाण पुलावर चढ घेतल्यानंतर वाहनांचा वेग स्वाभाविकपणे वाढतो. मात्र, उताराखाली लगेचच वेगमर्यादा लागू होत असल्याने वाहनचालकांना अचानक वेग कमी करणे कठीण जाणार आहे. परिणामी, स्पीड नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत दंड आकारला जाणार आहे.
वाहनधारकांच्या मते, हा प्रकार प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार न करता राबविण्यात आलेला एकतर्फी निर्णय आहे. “उतारावर वेग नियंत्रित करणे शक्य नसताना अशा ठिकाणी कॅमेरा बसवणे म्हणजे चालकांना जाणीवपूर्वक दंडात अडकवणे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. काहींनी तर याला “दंडवसुलीचा जबरदस्ती सापळा” असे संबोधले आहे.
स्थानिक नागरिकांनीही या समस्येकडे लक्ष वेधत महामार्ग प्रशासनाच्या नियोजनावरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आवश्यक असल्या तरी त्या व्यवहार्य असाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, वाहनधारकांकडून संबंधित स्पीड कॅमेरा तातडीने हलवून तो सपाट जागी बसवावा, तसेच वेगमर्यादा वास्तव परिस्थितीनुसार पुनर्निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, संतप्त वाहनचालकांकडून या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 110,108









