जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता. २१ : ग्रामीण भागातील मुलींची जिद्द, मेहनत आणि खेळाडूवृत्तीचा संगम काय कमाल करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथील मुलींनी घडवून दाखवले आहे. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे आयोजित पहिल्याच महिला व्यावसायिक ‘मिंटोनेट प्लस ज्युनिअर व्हॉलीबॉल लीग’ स्पर्धेत ‘पुणे फिनिक्स’ संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुंबईतील नेरूळ जिमखाना येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात पुणे फिनिक्सने नाशिक एसी गर्ल्स संघावर मात करत हा ऐतिहासिक विजय मिळवला.
या विजयात म्हसोबाचीवाडीच्या सात मुलींचा सिंहाचा वाटा ठरला. साक्षी साळुंखे, प्रणाली पवार, समृद्धी चांदगुडे, श्रावणी चांदगुडे, तनवी साळुंखे, अक्षदा पवार आणि सिद्धी जानकर यांनी संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळ करत संघाला बळ दिले. त्यांच्या अचूक सर्व्हिस, चपळ बचाव आणि आक्रमक स्मॅशेसमुळे प्रतिस्पर्धी संघावर सतत दबाव निर्माण झाला.
संघाचे नेतृत्व वेदिका शिंदे हिने समर्थपणे सांभाळले. उपज्ञा कारले, देवकी रावत, गीत सागजकट, अनया डिसा, विशाखा मोरे आणि श्रुती राऊत यांनीही उत्कृष्ट साथ देत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यातील चुरशीच्या खेळामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक संघाच्या वर्षा काळे हिला ‘बेस्ट लिबरो’ पुरस्कार देण्यात आला.
या यशामागे संघाच्या मालक शिल्पा गोयल यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षक किरण पवार व श्रुती माशाळे यांची अचूक रणनीती महत्त्वाची ठरली. त्यांनी खेळाडूंच्या क्षमतेनुसार आखलेली योजना आणि सातत्यपूर्ण सराव यामुळेच संघाने विजेतेपदाचा मान पटकावला.
ग्रामीण भागातील मुलींनी राष्ट्रीय स्तरावर नाव कमावत हा पराक्रम केल्याने म्हसोबाचीवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांकडून या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे यश इतर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रतिभा किती उंच भरारी घेऊ शकते, याचे हे यशस्वी उदाहरण ठरले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 99,130









