वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; पिक उध्वस्त,शेतकरी त्रस्त:वन विभाग मात्र गप्प

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.१५ : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी परिसरातील अभयारण्यामधील वन्य प्राण्यांकडून शेत पिकांवर अक्षरशः हल्लाबोल सुरू असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या संदर्भात वनविभागाकडे फोनद्वारे वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून याकडे गंभीरपणे पाहिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
म्हसोबाचीवाडी परिसर अभयारण्यालगत असल्याने तरस, रानडुक्कर, नीलगाय, तसेच हरिण प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे वन्य प्राणी शेतात घुसून मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या पिकांचा फडशा पाडला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अनेक वेळा फोनद्वारे व  तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र यावर ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. केवळ पाहणीची औपचारिकता करून प्रकरण थंडबस्त्यात टाकले जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.
पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी अनेक शेतकरी रात्री शेतातच थांबून पिकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही मोठ्या कळपाने येणाऱ्या वन्य प्राण्यांपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
वनविभागाने तातडीने या समस्येची गंभीर दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!