जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
पुणे, ता.३० : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या वाहन तपासणी मोहिमेत खडकवासला येथे मोठी कारवाई करण्यात आली. सोमवारी (ता. २९) सायंकाळी उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान एका कारमधून रुपये दोन लाखांची रोख रक्कम आढळून आली.
महानगरपालिका निवडणूक २०२५ अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड परिसरात रोख रकमेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यानुसार खडकवासला येथील चेक पोस्टवर सर्व वाहनांची काटेकोर तपासणी सुरू होती. या दरम्यान संशयास्पद कारची झडती घेतली असता वाहनात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली.
सदर रकमेबाबत चौकशी केली असता संबंधित व्यक्तींनी रकमेचा स्त्रोत, वापर अथवा त्यासंदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करत स्थिर सर्वेक्षण पथकाने पंचनामा करून रक्कम ताब्यात घेतली.
जप्त करण्यात आलेली रुपये दोन लाखांची रक्कम पुढील कारवाईसाठी नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत आर्थिक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अशा कारवायांना विशेष महत्त्व असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
खडकवासला येथील चेक पोस्टवर वाहन तपासणी करताना स्थिर सर्वेक्षण पथक व पोलीस अधिकारी.
ही कारवाई स्थिर सर्वेक्षण पथकाचे नोडल अधिकारी आशिष सुपणार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी पथक प्रमुख कुणाल मते, शुभम डोळस, महेश लोंढे तसेच भरारी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पथक प्रमुख रवीराज बेंद्रे, दिनेश सोनवणे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. निवडणूक काळात अशाच प्रकारची तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 25,159










