छोट्या आजारांवरही आता मोफत उपचार; महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार
जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
मुंबई, ता.३० :- राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी ; आता जवळच्या सरकारी दवाखान्यातच होणार सर्व मोफत उपचार
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार थेट गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आता नागरिकांना त्यांच्या जवळच्या सरकारी दवाखान्यातच मोफत उपचार मिळणार आहेत.
आतापर्यंत या योजनेचा लाभ प्रामुख्याने काही निवडक खासगी व मोठ्या सरकारी रुग्णालयांपुरताच मर्यादित होता. त्यामुळे साध्या उपचारांसाठीही ग्रामीण भागातील रुग्णांना शहरांकडे लांबचा प्रवास करावा लागत होता. या अडचणी लक्षात घेऊन शासनाने योजनेचा विस्तार प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ हा दरवर्षी दिला जातो. नव्या निर्णयामुळे गंभीर आजारांसोबतच किरकोळ आजारांवरही मोफत उपचार मिळणे शक्य होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जखमेवर टाके घालणे, लहान शस्त्रक्रिया, विविध तपासण्या तसेच आवश्यक उपचार पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या उपचारांसाठी शहरात जाण्याची गरज आता भासणार नसल्याने वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होणार आहे. या निर्णयामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेशी जोडण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रांना तात्काळ मंजुरी देऊन मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे शासनाकडून आता स्पष्ट करण्यात आले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 32,188










