जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
बारामती, ता.२९ :-बारामती येथील पवार स्पोर्टस् अकॅडमीची होतकरू व्हॉलीबॉल खेळाडू अपेक्षा संदीप पवार हिची आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील वयोगटातील शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे बारामतीसह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहान वयापासून व्हॉलीबॉलची आवड जपत अपेक्षा पवार हिने सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी साधली आहे. पवार स्पोर्टस् अकॅडमीमध्ये प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपली तांत्रिक कौशल्ये विकसित केली. राज्यस्तरीय निवड चाचण्यांमध्ये तिने केलेल्या उत्कृष्ट खेळाची दखल घेत तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.
अपेक्षाच्या या यशामागे अकॅडमीतील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि सातत्याने घेतलेला मेहनतीचा सराव मोलाचा ठरला आहे. आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असून तिच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीबद्दल पवार स्पोर्टस् अकॅडमीचे प्रशिक्षक,किरण पवार तसेच क्रीडाप्रेमी आणि विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून अपेक्षा पवार हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राचे आणि बारामतीचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 30,180










