जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे, ता.२३ : शस्त्र तस्करीच्या रॅकेटला आता थेट पाताळात घालण्याचा निर्धार केलेल्या पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटी गावावर तब्बल १०५ जणांचे पथक घेऊन पहाटेच धडक देत अवैध कारभाराचा फडशा पाडला. या धडक कारवाईत ३६ जणांना ताब्यात, तर २१ पिस्तुलांसह प्रचंड दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या ऑपरेशनमुळे मध्य प्रदेशातील शस्त्र पुरवठ्याच्या काळ्या बाजारात खळबळ उडाली आहे.
ड्रोनने नजर टाकली, मग पोलिसांनी गावावर धडक मारली!
उमरटीत पोहोचताच पुणे पोलिसांनी आधी ड्रोन उडवून संपूर्ण गावाचा ‘सर्व्हे’ केला. कोण कुठे आहे, कोणत्या घरात भट्ट्या पेटल्या आहेत, कोणत्या छपराखाली सुटे भाग तयार होतात याचा संपूर्ण नकाशाच काढला.
सर्व तयारी पूर्ण झाल्यावर पहाटेच्या अंधारात गावावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले.
५० भट्ट्यांचा भुगा!
कारवाईदरम्यान शस्त्रनिर्मिती करणाऱ्या ५० पेक्षा जास्त भट्ट्या जप्त-विध्वंसित करण्यात आल्या. काही घरांत तयार पिस्तुलं, तर काहीत सुटे भाग, फ्रेम्स, मेटल कास्टिंग, आणि भट्ट्यांचे अवजड साहित्य उघड झाले. गावातील जवळपास ५० घरांची झडती घेऊन पोलिसांनी अवैध व्यवसायाचा संपूर्ण खेळ मांडून ठेवला.
पुण्यात पकडलेल्या २१ पिस्तुलांपासून धागा मिळाला
गेल्या काही दिवसात विमानतळावरील पोलिसांकडे व खंडणीविरोधी पथकाकडे २१ पिस्तुलं जप्त झाली होती. चौकशीत त्याचा धागा थेट उमरटी गावापर्यंत पोहोचला. त्यानंतर पुणे पोलिसांनी शस्त्र तस्करीचे जाळे मोडण्यासाठी ऑपरेशनची आखणी केली आणि सीमापार धडक मोहीम उभी राहिली.
शस्त्र तस्करांना थेट इशारा — ‘पुणे पोलीस मैदानात उतरल्यावर सुटका नाही’
या कारवाईने मध्य प्रदेशातील अवैध शस्त्र पुरवठ्याच्या संपूर्ण रॅकेटची कंबर मोडली आहे. उमरटीतील पिस्तुलांचा प्रवास आता थांबवला गेला असून तस्करांना स्पष्ट संदेश मिळाला आहे — पुणे पोलिसांचे ऑपरेशन सुरू झाले की, अवैध साम्राज्य उभेच राहणार नाही!
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह










