कलशारोहण–प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी; ग्रामस्थांच्या योगदानातून ११ महिन्यात ८० लाखांची मंदिर उभारणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क

भोर, ता.२५ | मोरवाडी गावाचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर उभारणीचा ऐतिहासिक क्षण आगामी तीन दिवसांत सोहळ्याच्या रूपाने साजरा होणार असून, ग्रामस्थांपासून उद्योजकांपर्यंत सर्व घटकांच्या सहकार्याने केवळ ११ महिन्यांत ८० लाख रुपयांत उभारलेलं हे मंदिर भाविकांच्या दृष्टीने एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय मोरे, सरपंच ज्योती दीपक मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांच्या अखंड प्रयत्नांमुळे हे स्वप्न सत्यात उतरवलं.

 

कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापनेचा अनोखा सोहळा

 

दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसीय सोहळ्यासाठी भव्य कार्यक्रमांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. मंदिराच्या कलशारोहणासाठी श्री. शंकराचार्य विद्याशंकर नरसिंह भारती (करवीर पीठ, कोल्हापूर) तसेच ह.भ.प. हनुमंत बापू जगताप (माहूर, बालब्रह्मचारी) यांची उपस्थिती लाभणार आहे.

 

मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय मोरे व सौ. विजया मोरे यांच्या शुभहस्ते पार पडणार असून, पुण्याचे प्रसिद्ध वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी विधिवत पूजन सोहळा पार पाडतील.

 

पहिला दिवस: भव्य मिरवणूक आणि जागर

 

शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मूर्ती व कलशाची भव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरुन काढण्यात येणार आहे. संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन असून, रात्री ९.३० पासून प्रसादिक भजनी मंडळ, वागजवाडी आणि ग्रामस्थांच्या सहभागात जागर कार्यक्रम रंगणार आहे.

 

दुसरा दिवस: होमहवन, कीर्तनसेवा व जागर

 

शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होमहवनाचे आयोजन आहे. सायं. ७ ते ९ वाजता महाप्रसादानंतर रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. जालिंदर महाराज नरवडे (अहिल्यानगर) यांचे कीर्तन गावकऱ्यांना अध्यात्मिक ऊर्जा देणार आहे. रात्री ११ वाजता श्री भैरवनाथ भजनी मंडळ (कासुर्डी) तसेच ग्रामस्थ मंडळ, किकवी यांचा जागर कार्यक्रम होणार आहे.

 

अंतिम दिवस: प्राणप्रतिष्ठा व दिवसभर धार्मिक कार्यक्रम

 

रविवार, ३० नोव्हेंबर हा सोहळ्याचा मुख्य दिवस. दुपारी १२ वा. १० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा, तर १२.२५ वाजता कलशारोहण होणार आहे. दुपारी १ ते सायं. ४ महाप्रसाद. सायं. ४ ते ६ ह.भ.प. उद्धवजी महाराज चोले (परळी) यांचे कीर्तन आणि रात्री ९ ते ११ ह.भ.प. मिलींद महाराज ढम (भजनसम्राट, पळशी) यांचा भजन संध्येचा कार्यक्रम होणार आहे.

 

लक्षवेधी मान्यवरांची उपस्थिती

 

या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. व्यंकटेशराव साहेब (व्यंकीज ग्रुप ऑफ कंपनीज )  मा.श्री. शंकरभाऊ मांडेकर (आमदार, भोर–मुळशी), मा.श्री. संग्राम थोपटे ( मा. आमदार), मा.श्री. दत्तात्रय धनकवडे (माजी महापौर, पुणे), मा.श्री. रणजित शिवतरे (मा. उपाध्यक्ष, जि.प. पुणे) यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

 

ग्रामस्थांचा सहभाग, देवस्थानाचा गौरव

 

या संपूर्ण उभारणीत ग्रामस्थ, उद्योजक, राजकीय हितचिंतक यांचे स्वयंस्फूर्त योगदान असल्याचे मंदिर समितीने सांगितले. अवघ्या ११ महिन्यांत ८० लाख खर्चात उभारण्यात आलेलं विठ्ठल-रूक्मिणी मंदिर गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

भाविक, दानशूर व भक्तमंडळींसाठी हा सोहळा ‘भक्ती, संस्कृती आणि एकतेचा उत्सव’ ठरणार आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!