बैल पोळ्याला आधुनिकतेचा स्पर्श : ट्रॅक्टर सजवून काढली रॅली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता.२२ : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावाने यंदाचा बैल पोळा अनोख्या पद्धतीने साजरा करत संपूर्ण परिसरात वेगळा ठसा उमटवला. परंपरेनुसार बैलांच्या शृंगारासोबत गावात आकर्षक मिरवणूक काढली जाते, मात्र यावेळी गावकऱ्यांनी आधुनिकतेचा संगम साधत ट्रॅक्टरची देखील दिमाखदार सजावट केली. रंगीबेरंगी कागदफुलं, पताका आणि लखलखत्या रोषणाईने सजवलेले ट्रॅक्टर गावातील प्रमुख रस्त्यांवरून रॅलीच्या स्वरूपात फिरले.
या रॅलीत ट्रॅक्टर मालक वाल्मीक चव्हाण, गुड्डू पवार आणि वैभव चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या सजवलेल्या ट्रॅक्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीची खासियत म्हणजे ट्रॅक्टरच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने सजवलेली बैलांची जोडी होती. गावकरी ढोल-ताशांच्या गजरात उत्साहाने सहभागी झाले होते.
रॅलीने पूर्ण गावाला वळसा घातल्यानंतर हा अनोखा उत्सव श्री क्षेत्र महादेव मंदिर परिसरात स्थिरावला. तेथे पारंपरिक विधीपूर्वक बैलजोडीचा ‘लग्न सोहळा’ पार पडला. गावातील वयोवृद्ध मंडळींपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. बैलांना हार-फुले, घंटा, झुल आणि आकर्षक शृंगाराने सजवण्यात आले होते. वधू-वराप्रमाणे बैलांच्या जोडीला मांडवात आणून मंगलाष्टकांच्या गजरात हा लग्नसोहळा पार पडला.
संपूर्ण वातावरण भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाने भरून गेले होते. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा पोळा गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. उपस्थित युवा शेतकरी यावेळी म्हणाले की, “अशा प्रकारे बैल पोळा साजरा केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनातील कष्टकरी मित्र म्हणजे बैलांना योग्य तो मान मिळतो, तसेच नव्या पिढीला परंपरेची ओळख होते.”
म्हसोबावाडीतील या वेगळ्या उत्सवाची चर्चा केवळ परिसरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. गावाने साजऱ्या केलेल्या या आगळ्या वेगळ्या पोळ्याने खऱ्या अर्थाने परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम दाखवून दिला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!