महात्मा फुले यांच्या साक्षीने 1881 च्या जनगणनेत मराठा कुणबींची नोंद : इतिहासाकडे डोळसपणे पाहण्याची गरज — विश्वास पाटील.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.९ – सामाजिक चळवळींचे प्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ शैक्षणिक व सामाजिक क्रांतीपुरते मर्यादित नव्हते, तर ब्रिटिश काळात नगरपालिकेचे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून त्यांनी जनगणनेसारख्या महत्त्वाच्या कामामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1876 ते 1883 या काळात ते पुणे नगरपालिकेचे कौन्सिलर (नगरसेवक) होते. त्याच काळात म्हणजे 17 फेब्रुवारी 1882 रोजी झालेल्या जनगणनेत पुणे जिल्ह्यातील समाजघटकांची तपशीलवार नोंद घेण्यात आली.
या जनगणनेत पुणे जिल्ह्यात कुणबींची संख्या तीन लाख 96 हजार 587 तर माळी समाजाची संख्या 52 हजार 527 इतकी नोंदली गेली होती. ही संपूर्ण जनगणना प्रक्रिया ब्रिटिश अधिकारी डब्ल्यू. एम. फ्लेचर (सुप्रीटेंडंट ऑफ रेव्हेन्यू सर्वे), पुणे कॅन्टोन्मेंटचे मॅजिस्ट्रेट एच. ई. विंटर आणि पुणे नगरपालिकेचे तत्कालीन सचिव रावसाहेब नरसो रामचंद्र यांच्या जबाबदारीखाली पार पडली. नगरपालिकेतील सदस्य म्हणून महात्मा फुले यांच्या साक्षीने व मार्गदर्शनाखालीच हे काम पार पडले होते.
जनगणनेचा प्राथमिक मसुदा (Draft) प्रसिद्ध करून ब्रिटिशांनी त्यावर आक्षेप मागवले होते. काही महिन्यांची मुदत देऊनच अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यासह देशभरातील विविध प्रांतांमध्ये एकाच दिवशी जनगणनेचे काम पूर्ण करण्यात आले होते. सातारा व पुणे जिल्ह्यांमध्ये सर्व मराठा हे कुणबी असल्याची नोंद ब्रिटिश सरकारने स्पष्टपणे केली आहे.
इतकेच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या गॅझेटच्या व्हॉल्युम-१ मधील इंडेक्समध्ये पान क्रमांक 572 वर “Marathas — see Kunbis” असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच कुणबी समाजाचे जीवन, चालीरीती, शेतीपद्धती याचे वर्णन पान क्रमांक 284 ते 309 पर्यंत तब्बल 25 पाने भरून केलेले आहे.
ब्रिटिश काळात संपूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सी, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, बेरर आणि निजामाच्या डॉमिनियनमधील मराठा समाजापैकी तब्बल 82 टक्के लोकांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. ही आकडेवारी जवळपास 45 वर्षे अधिकृत नोंदींमध्ये तशीच चालू राहिली. नंतर मराठी व तेलगू भाषेत अनुवादाच्या प्रक्रियेत हळूहळू बदल होऊ लागले.
ब्रिटिश गॅझेटमध्ये कुणबींना “husbandmen” (शेती करणारे, पशुपालक) असा शब्दप्रयोग करून प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य कास्तकार समाज म्हणून नोंदलेले आहे. तेलंगणातील नोंदींमध्ये याचाच “कापू” असा उल्लेख केलेला दिसतो.
विश्वास पाटील म्हणाले की, महात्मा फुले सामाजिक चळवळींमध्ये उच्च जातींच्या वर्चस्वाविरोधात लढत असताना, त्यांच्या चळवळीला माळी समाजाची संख्या कमी असली तरी कुणबी समाजाने उघड्या छातीने साथ दिली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी समाजाने या वस्तुस्थितीकडे डोळसपणे पाहिले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“आजचा संघर्ष हा राजकीय नव्हे तर सामाजिक आहे. निवडणुका येतात-जातात, पण समाजातील दुर्बल गटांचे डोके फुटले तर त्यांना टाके घालणे अवघड होईल. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची नावे घेऊन त्यांच्याच बहुसंख्य गरीब वंचित कुणबी बहुजनांना तुडवण्याचा उद्योग कोणी करू नये,” असे आवाहन विश्वास पाटील यांनी केले.
त्यांनी पुढे सांगितले की, निजाम व ब्रिटिशकालीन आकडेवारीनुसार मराठवाड्यातील 80 ते 82 टक्के लोक कुणबी असल्याच्या नोंदी तीनशे-चारशे पानांपर्यंत पसरलेल्या आहेत. “या आकडेवारीकडे संसद, विधानसभा किंवा न्यायालयात कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही. तथाकथित पुरोगामी महाराष्ट्र डोळस व्हावा हीच माझी इच्छा आहे,” असे ते म्हणाले.
इतिहासातील ही वस्तुस्थिती पुढे करताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांची आठवण करून दिली. “मोरारजींच्या डमडमच्या गोळ्या छातीवर झेलून हुतात्मा झालेल्या 106 पैकी 76 जण कुणबी समाजातील होते. त्यांच्या आत्म्याचीही आज हीच इच्छा असेल,” असे ते म्हणाले.
पाटील यांनी स्पष्ट केले की, ते कधीच जातीयवादी नव्हते. “भाऊसाहेब पेशव्यांना पानिपतात नायक बनवले म्हणून मला मराठ्यांच्याही शिव्या खाव्या लागल्या. झाडाझडतीचा माझा नायक खैरमोडे मास्तर हे दलित होते. त्या काळातसुद्धा मी रोषाचा बळी पडलो होतो. आताच्या सामाजिक जखमेवर शांतपणे दवा शोधली पाहिजे, ती चिघळवू नये,” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!