जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने, राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. त्याअनुषंगाने संपुर्ण राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा कडक सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी हा गेला थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र लाडक्या महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा ही आता लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे.
आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव पाडण्यात येणाऱ्या योजना हया त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच, आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही यावेळी घेण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली आहे. त्यानुसारच, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं आता समोर आल्याने. बालकल्याण विभागाकडून या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच बालकल्याण विभागाने या योजनांच्या निधीचे वितरण 4 दिवसांपूर्वी थांबविल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे .
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह