म्हसोबाचीवाडीतील जाणता राजा चौक–निरगुडे-लाकडी मार्ग खड्डेमय; ग्रामस्थांचा संताप शिगेला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२३: इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील जाणता राजा चौक ते निरगुडे–लाकडी या (३ किमी) रस्त्याला जोडणारा ढाळेवस्ती मार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुचाकी, चारचाकी तसेच शेतमाल वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत असल्याची स्थिती आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांच्या मते, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मिळू नये म्हणून काही स्थानिक पुढाऱ्यांनी अडथळे निर्माण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सार्वजनिक कामांमध्ये हस्तक्षेप करून वैयक्तिक स्वार्थ साधला जातो, मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे डबके साचत असल्याने परिस्थिती आणखी बिकट बनते. काही ठिकाणी खोल खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असतानाही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी थेट राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना सवाल उपस्थित केला आहे. “गावातील या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष दिले जाणार का? निधी प्रक्रियेत होणाऱ्या अडथळ्यांना आळा घालण्यात येणार का?” असा संतप्त सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या एकमुखी मागणीनुसार, रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून सुरक्षित वाहतुकीची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच या प्रश्नाकडे केवळ रस्त्याच्या दुरुस्तीचा मुद्दा म्हणून न पाहता, तो ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा आणि स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीचा विषय बनला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, म्हसोबाचीवाडीतील ढाळेवस्ती रस्त्यासाठी   यापूर्वीही ग्रामस्थांनी मुद्दा उपस्थित केला होता. मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना गावात निर्माण झाली असून, रस्त्याचा प्रश्न हा त्या नाराजीचा नवा टप्पा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती ठोस कार्यवाही करतात, याकडे गाववासियांचे लक्ष लागले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!