जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी तिन्ही दिग्गज एकत्र ; तिकीट वाटपावरून कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर
जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२२ : पुणे जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. गेली दोन दशके एकमेकांविरुद्ध राजकीय लढती लढणारे तालुक्यातील तिन्ही दिग्गज नेते अलीकडच्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे अचानकपणे जवळ आले असून या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढली.
२० ते २५ वर्षे परस्परांवर टीका करत, वेगवेगळ्या गटांतून राजकारण करणारे हे नेते आता एकत्रित भूमिका घेत आहेत. मात्र या बदलामागील कारणांबाबत वेगवेगळ्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुकांत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही जवळीक वाढल्याचे बोलले जात असून, यामध्ये स्थानिक पातळीवरील नेतृत्वाऐवजी कौटुंबिक पातळीवरील नियोजनाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
विशेषतः तिकीट वाटपाच्या प्रक्रियेवरून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणारे, गावोगावी संघटन मजबूत करणारे कार्यकर्ते बाजूला राहिले असून काही ठिकाणी उमेदवारी थेट नेत्यांच्या कुटुंबीयांना दिली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे “निष्ठा, काम आणि योगदान याऐवजी नातेसंबंध महत्त्वाचे ठरत आहेत का?” असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
गावपातळीवर काम करणारे अनेक कार्यकर्ते खासगीत आपली नाराजी व्यक्त करत आहेत. पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना “निकष जुळत नाहीत” किंवा “योग्य संधी नाही” अशी कारणे सांगून दूर ठेवले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. परिणामी, संघटनात्मक पातळीवर असंतोष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर मतदारांमध्येही चर्चा सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया केवळ व्यक्ती वा घराण्यांपुरती मर्यादित राहू नये, तर स्थानिक प्रश्न, विकास आणि जनतेच्या अपेक्षा केंद्रस्थानी असाव्यात, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार की पुन्हा काही घराण्यांपुरतीच सत्ता मर्यादित राहणार?” हा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ही जवळीक तात्पुरती की दीर्घकालीन ठरणार, हे आगामी उमेदवारी याद्यांवर स्पष्ट होईल. मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दुर्लक्षित केल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो, असा इशाराही दिला जात आहे.
एकीकडे दिग्गज नेत्यांची भूमिका चर्चेत असताना, दुसरीकडे कार्यकर्त्यांचा सन्मान, पक्षनिष्ठा आणि लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता हे मुख्य मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. इंदापूरच्या राजकारणात ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर नेतृत्वाच्या पद्धतीची आणि संघटनात्मक विश्वासार्हतेची कसोटी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 45,253









