जनसंघर्ष न्युज नेटवर्क
दौंड, ता.१२ : महसूल खात्यातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती करण्यासाठी तडजोडीअंती दोन लाख रुपयांची लाच घेताना दे लवडी (ता. दौंड) येथील तलाठी दीपक नवनाथ आजबे (वय ३९, तलाठी सजा देलवडी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार १० रोजी ‘साईराज कॅन्टीन’, केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी २०१२ साली मौजे देलवडी (ता. दौंड) येथील गट क्रमांक १५०६ मधील ०.०६ आर क्षेत्र खरेदी केले होते. मात्र, जुलै २०२४ मध्ये काढलेल्या संगणकीय सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावावर केवळ ०.०३ आर क्षेत्र नोंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर तक्रारदारांनी २४ ऑगस्ट रोजी तलाठी दीपक आजबे यांच्याकडे दुरुस्तीचा लेखी अर्ज दिला होता.
पुढील काही महिन्यांपासून तक्रारदार वारंवार तलाठी कार्यालयात पाठपुरावा करत होते. दरम्यान, आजबे यांनी हे काम करून देण्यासाठी चार लाख रुपयांची मागणी केली. या मागणीची तक्रार तक्रारदारांनी ६ नोव्हेंबर रोजी एसीबी कार्यालय, पुणे येथे केली. त्यानंतर ७ आणि १० नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत तलाठी आजबे यांनी तक्रारदाराच्या कामासाठी सुरुवातीला ३ लाख, नंतर तडजोडीअंती २ लाख रुपयांवर व्यवहार मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सोमवार (१० नोव्हेंबर) रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केडगाव चौफुला येथील साईराज कॅन्टीनमध्ये तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारताना तलाठी आजबे रंगेहात पकडला गेला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलिस उपआयुक्त व अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील आणि पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे व शैलजा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
🔹 “सरकारी कामांसाठी लाच घेणाऱ्यांवर यापुढे एसीबीकडून मिळणार करारा जबाब”
🔹 शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लाचखोरांवर एसीबीची सापळा कारवाई!
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 11,207










