वाजले की बारा जाऊ द्या ना घरी! इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत ‘पक्षांतरवीर’ उमेदवारांवर मतदारांचा रोष; जनता शिकवणार का धडा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.१२ — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजताच  इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांचा तुफान फेरा सुरू झाला . पाच वर्षे विशिष्ट नेत्यांच्या संगतीत राहून निष्ठेच्या नावाखाली पक्षाच्या गल्लीपासून जिल्ह्यापर्यंत मोठमोठे डंका पिटणारे अनेक कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार आता पक्ष बदलण्याच्या स्पर्धेत धावत असल्याचं चित्र शहरात स्पष्टपणे दिसत आहे.
यामुळे मतदारांमध्ये संतापाची लाट असून “यांना आता वाजले की बारा, जाऊ द्या ना घरी!” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरातील अनेक प्रभागांमध्ये विकास कामांपेक्षा पक्षांतरे, गटबाजी आणि पदाच्या हव्यासाची चर्चा जास्त झाली. काही जणांनी स्वतःचा राजकीय प्रभाव वाढावा म्हणून वारंवार पक्ष बदलत जनतेचा विश्वास डळमळीत केला. निवडणुकीच्या घोषणेनंतर मात्र या ‘पक्षांतरवीरां’वर संकट ओढवले आहे. ज्यांच्याकडे निवडणुकीत सक्रीय भूमिका घेण्याची उमेदवारीची अपेक्षा होती, त्यांनाच स्वतःचेच राजकीय गणित जड जात आहे.
निवडणुकीपूर्वी “आम्ही अमुक नेत्याचे माणसं”, “आम्ही तमुक वस्तादाचे पट्टे”, “आम्हीच खरी संघटना उभी केली”, “आम्ही शिवलेली लंगोट गावभर चालते” अशा गर्वोक्ती करणारे अनेक नेते आणि त्यांचे समर्थक हेच आता नवे समीकरण जुळवताना दिसत आहेत.
शब्दांमध्ये निष्ठा दाखवणारे प्रत्यक्षात मात्र स्वार्थासाठी पक्षांच्या दारात फेरफटका मारताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी वाढली आहे.
यामध्ये काही ठेकेदारी, मलिदा कमावणारे आणि नगरसेवकगिरीचे आर्थिक बळ वाढवण्यासाठी राजकारण करणारे चेहरे देखील आहेत. त्यांच्या काळात अनेक प्रभागांत रस्ते, गटारे, नाली, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सोयींचा बोजवारा उडाला. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून चालताही त्रास सहन करावा लागला. अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष — या सर्व बाबींमुळे शहरातील जनतेचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र याच उमेदवारांची स्थिती ‘गुडघ्यात मुंडके घालून बसल्यासारखी’ झाल्याचं चित्र लोकप्रत्यक्ष पाहत आहेत. पूर्वी जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारे भाषणबाज नेते आज शांत, निरीक्षक विचारात पडलेले दिसत आहेत. कारण — जनमत त्यांच्या विरोधात फिरत असल्याची त्यांना जाणीव होत आहे.
इंदापूरमध्ये या निवडणुकीत यंदा जनतेने ‘निष्ठेची आणि विकासाची परीक्षा’ घेण्याचा मनोदय केला आहे. पक्षांतर करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यावेळी मतदारांकडून ठोस उत्तर मिळणार, असा सूर शहरातील छोट्या दुकानांपासून चौकातील चर्चांमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे.
एकंदरीत — इंदापूरच्या नगरपरिषद निवडणुकीत केवळ प्रचारात नव्हे तर स्वभावात आणि वर्तनातही ‘परिवर्तन’ अपेक्षित आहे.
निष्ठा, सचोटी आणि जनसेवा यांवर जनता विश्वास ठेवणार आहे.
ज्यांच्यावर जनता नाराज आहे, त्यांच्यासाठी एकच संदेश —
“आता वाजले की बारा… जाऊ द्या ना घरी!”
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!