महिलांचा विश्वास, कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि विकासाची दिशा – सोनाली देशमुख चर्चेत!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
शिरवळ (ता. खंडाळा) ता.२३ : आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवळ गणात स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे सौ. सोनाली संजयसिंह देशमुख या इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत असून, त्यांच्या उमेदवारीमुळे गणातील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य करत असताना सौ. देशमुख यांनी गावातील पाणीपुरवठा, रस्ते, शाळा आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विशेषत: महिलांसाठी दरवर्षी आयोजित होणारा हळदीकुंकू समारंभ आणि पारंपरिक खेळांच्या स्पर्धा या उपक्रमांमुळे त्यांनी महिला वर्गात विशेष लोकप्रियता मिळवली आहे. सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी एक कार्यक्षम आणि संवेदनशील नेतृत्व दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
गेल्या २५ वर्षांपासून संजयसिंह देशमुख यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ग्रामविकास, शिक्षण, जलसंधारण, रस्त्यांची सुधारणा, तसेच सामाजिक प्रश्नांवर केलेले कार्य यामुळे देशमुख कुटुंबाने शिरवळ परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अनुभवाचा फायदा सोनाली देशमुख यांना निवडणुकीत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या गणात तृप्ती देशमुख व लक्ष्मी पानसरे (भाजप), रेखा तांबे (राष्ट्रवादी अजित पवार गट), सूर्याती भरगुडे (राष्ट्रवादी पळशी) आणि शारदा जाधव (शिवसेना) अशी नावेही चर्चेत आहेत. तसेच जिल्हा परिषद गटासाठी अजय भोसले (जवळे-पळशी), उदयदादा कबुले, प्रदीप माने, अनुप सूर्यवंशी आणि चंद्रकांत यादव हेही संभाव्य स्पर्धक मानले जात आहेत.
गावाच्या विकासासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सौ. सोनाली देशमुख यांच्या उमेदवारीकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवरील जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि शिवसेनेच्या भक्कम संघटनात्मक बळावर त्या या निवडणुकीत प्रभावी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!