जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२४ :म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे ग्रामदैवत यशवंतराय यात्रेनिमित्त यावर्षी भाऊबीजच्या शुभदिनी यात्रा समितीच्या वतीने पारंपरिक कुस्ती स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. संध्याकाळी साडेचार वाजता सुरू झालेल्या या कुस्त्यांमध्ये लहान व मोठ्या वयोगटातील पैलवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावकऱ्यांच्या घोषणांनी आखाडा दणाणून गेला.
या कुस्त्यांमध्ये विशेष आकर्षण ठरली ती महिलांची झुंज. बारामतीच्या भावना रावत व भक्ती फुलारे या दोन महिला पैलवानांमध्ये झालेल्या रोमांचक कुस्ती फाईटने प्रेक्षकांची मने जिंकली. दोघींच्या दमदार झुंजीदरम्यान “यशवंतरायाचे चांगभल”च्या घोषणा घुमल्या. अखेर भावना रावतने उत्तम डाव साधत भक्ती फुलारेला चितपट केले आणि ३५०० रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जिंकण्याचा मान मिळविला.
दरम्यान, बारामती येथील महिला पैलवान सोनाली शेंडे हिला जोड मिळाली नसल्याने तिची कुस्ती होऊ शकली नाही. तरीदेखील पंच समितीने तिच्या जिद्दीचा गौरव म्हणून २००० रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मान केला.
यात्रा समितीच्या वतीने १०० रुपयांपासून ११,००० रुपयांपर्यंतच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या पैलवानांना रोख बक्षिसांसह गौरविण्यात आले. या आखाड्यात स्थानिक तरुणांचा उत्साह, दुरदुरहून आलेल्या पैलवानांचा सहभाग आणि महिलांची झुंज या सर्वांनी यात्रेचा उत्साह दुणावला.
भावना रावत यांनी विजयानंतर बोलताना सांगितले, “कुस्ती ही पुरुषांचीच नव्हे, तर महिलांचीही ताकद दाखवणारी परंपरा आहे. आता गावपातळीपासून देशपातळीपर्यंत मुली आखाड्यात झुंज देत आहेत. त्यासाठी अधिक संधी व प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
यशवंतराय यात्रेतील या कुस्त्यांनी पारंपरिक आखाड्याला नवी दिशा देत महिलांच्या सहभागाची नवी पहाट उगवली असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 4,221










