जनसंघर्ष वृत्तसेवा –
इंदापूर, ता.१६ : रुईपाटी ते म्हसोबाचीवाडी निरगुडे या महत्त्वाच्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने आणि साईटवरील झाडे वाढल्याने वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. वेताळाचा माळ ते म्हसोबाचीवाडी या रस्त्यावरील साईट पट्ट्या खचलेल्या होत्या, झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या होत्या आणि पावसाळ्यानंतर रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. या समस्येकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनसंघर्ष न्यूजचे संपादक संजय चांदगुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमित इंगळे साहेब यांच्याशी बुधवारी (दि.१५ ऑक्टोबर) सकाळी दूरध्वनीवर चर्चा केली.
या चर्चेत चांदगुडे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका आणि वाढत्या झाडांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांचा मुद्दा अधोरेखित केला. या तक्रारीकडे तत्काळ लक्ष देत इंगळे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गुरुवार दि.१६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, संबंधित ठिकाणी काम सुरू करण्याचे आदेश दिले.
यानुसार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेतले. रस्त्यावरील खोल खड्डे बुजवण्यात आले, तसेच साईटवरील वाढलेली झाडे व फांद्या छाटण्यात आल्या. त्यामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला असून, या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या तातडीच्या कारवाईचे स्वागत केले असून, “रस्त्यावरील दुरवस्थेवर तत्काळ उपाययोजना केल्याबद्दल अमित इंगळे साहेबांचे आभार मानतो,” असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक महिन्यांपासून या रस्त्यावरून जाणे अवघड झाले होते. आता रस्ता खड्डेमुक्त झाल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीस, तसेच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेली ही तत्परता प्रशासनातील जबाबदारी आणि जनतेच्या तक्रारींना मिळालेला योग्य प्रतिसाद दर्शवणारी ठरली आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 116











