जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.११ : – दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी माध्यमिक विद्यालय, म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या पुणे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान ज्युनिअर कॉलेज बारामती (१९ वर्षे वयोगट) मुली, मराठी माध्यमिक शाळा विद्या प्रतिष्ठान बारामती (१४ वर्षे वयोगट) मुली आणि शारदानगर बारामती (१७ वर्षे वयोगट) या तिन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावर खेळण्याचा मान मिळवला आहे.
या यशामुळे बारामतीचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक आणखी उंचावला असून, विशेष म्हणजे म्हसोबावाडी गावातील विद्यार्थीनींनी स्पर्धेत उल्लेखनीय योगदान देत गावाचे नाव उज्ज्वल केले.
१४ वर्षे वयोगटात चमकदार खेळ करत संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या म्हसोबावाडीतील खेळाडूंमध्ये अपेक्षा पवार, अक्षरा पवार, अक्षदा पवार, साक्षी महाडिक, इशिता सूर्यवंशी, ऋतुजा पवार, दिशा चांदगुडे आणि श्रावणी पवार या खेळाडूंचा समावेश आहे.
तर १९ वर्षे वयोगटातील विजयी संघात म्हसोबावाडी गावातील समृद्धी चांदगुडे, श्रावणी चांदगुडे, तन्वी साळुंके, साक्षी साळुंखे, प्रणाली पवार, वर्षा काळे, स्नेहा जगताप, शिवांजली साळुंखे, अस्मिता इंगोले आणि दीक्षा गाडेकर या खेळाडूंची झुंज पाहायला मिळाली.
खेळाडूंच्या या यशामागे पवार अकॅडमीचे प्रशिक्षक किरण पवार सरांचे मार्गदर्शन आणि सततचे परिश्रम विशेषत्वाने अधोरेखित करावे लागतील. त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी महेश चावले, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटना पंचमंडळ अध्यक्ष सुरेंद्र जाधव, तसेच माजी मुख्याध्यापिका माधवी सूर्यवंशी, कृषी अधिकारी शहाजी आप्पा सूर्यवंशी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पवार, मुख्याध्यापक भोंग सर, अध्यक्ष अंकुश पवार, तंटामुक्ती अध्यक्ष लालासो साळुंखे, समिती अध्यक्ष सोमनाथ ढमाळ आणि संदीप कवडे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी दाखवलेला संघभाव, शिस्त आणि जिद्द यामुळे बारामतीतील व्हॉलीबॉल खेळाला नवीन दिशा मिळाली आहे. स्थानिक पातळीवरील खेळाडूंनी जिल्हास्तरावर गाजवलेले यश पाहता गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या यशाबद्दल गावकऱ्यांनी सर्व खेळाडूंना तसेच प्रशिक्षक आणि आयोजकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, विभागीय स्तरावरही हे खेळाडू असाच विजय मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
म्हसोबावाडीतील या तरुणींच्या विजयानंतर गावात उत्साहाचे वातावरण असून, शाळा व पालकांनी त्यांच्या कामगिरीचा विशेष गौरव केला आहे.
बारामतीच्या क्रीडाक्षेत्राला मिळालेला हा नवा गौरव आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 184










