जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
पुणे, ता.११ : पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजनंतर आता राज्य सरकारने नवीन शासन निर्णय (GR) जाहीर केला असून, यात आधी वगळलेल्या भागांनाही मदतीचा लाभ देण्यात आला आहे. या सुधारित निर्णयामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना मोठा आधार मिळणार आहे.
सुरुवातीच्या GR मध्ये 29 जिल्ह्यांमधील 253 तालुकेच पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, विविध भागांमधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या वाढताच सरकारने पुनर्विचार करून नवीन GR जारी केला आहे. या सुधारित GRनुसार आता 34 जिल्ह्यांमधील तब्बल 347 तालुके पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, जमीन महसूल माफी आणि कर्ज सवलतीचा लाभ मिळणार आहे.
या नव्या निर्णयात शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सरकारने संपूर्ण माफी जाहीर केली आहे. विशेषतः 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णपणे माफ करण्यात आली असून, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील महसुलात पूर्ण सूट देण्यात आली आहे. सहकारी सोसायटी, बँक या मधील कर्जाचे पुनर्गठन करून शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, तिमाही वीजबिलात सूट देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारचा हा सुधारित GR म्हणजे पूर आणि अतिवृष्टीमुळे कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा निर्णय ठरणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तातडीने अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आणि पालकांमध्ये दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 101










