जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.९ – निरगुडे (ता. इंदापूर) येथील 33/11 केव्ही सबस्टेशनच्या वीजपुरवठा लाईन कामावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. वाकडे वस्तीच्या नावाखाली प्रत्यक्षात खडी क्रशरसाठी वीजपुरवठा लाईन घेतली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा स्पष्ट आग्रह आहे की, पूर्वीची लाईन इरिगेशनच्या हद्दीतून, कॅनॉलच्या कडेला गेली आहे, मग नवीन लाईनही त्याच मार्गाने न्यावी. मात्र अधिकाऱ्यांनी तो मार्ग सोडून थेट शेतकऱ्यांच्या शेतातूनच लाईन घालण्याचा हट्ट धरला आहे.
यावरून शेतकऱ्यांनी विरोध केला असता, बारामती ऊर्जा भवनचे जाधव साहेब आणि सणसर येथील बोरनारे साहेब यांनी पोलीस बंदोबस्तात उभे राहून थेट “बघूया कोण आडवे येतं! आम्ही ह्याच मार्गाने लाईन नेणार!” असा दबंगगिरीचा इशारा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शेताचे 7/12 उताऱ्यावर फक्त दोन गुंठे क्षेत्र वजा दाखवले असताना प्रत्यक्षात मोठा रस्ता त्यांच्या शेतातून काढण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही MSEB चे अधिकारी आणि ठेकेदारांनी ‘अंडरग्राउंड लाईन’चा पर्याय नाकारला आहे.
या प्रकाराने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे उभे राहिले आहेत. “शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देणे हेच आमचे काम आहे. सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निर्भीड आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून भगवान खारतोडे यांची ओळख निर्माण झाली आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 337










