जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.२७ : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था शासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. २५ मे रोजीच्या अवकाळी पावसाने घरं, दुकाने, रस्ते आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अधिकारी गावोगावी धावले, पंचनाम्यांची वही भरली, फोटोसेशन झाले, सही घेतली. इतकं करून चार महिने उलटले, पण शेतकऱ्यांच्या हातात शेत नुकसानीच्या भरपाईचा एक रुपयाही पडलेला नाही!
सरकारच्या या कारभाराला शेतकरी सरळ ‘फसवेगिरी’ असेच नाव देत आहे. कारण, शेतकरी संकटात सापडला की पंचनामे करण्यासाठी यंत्रणा वाऱ्यासारखी धावते; पण पैसे वाटपाच्या वेळी मात्र ती फाईल कपाटात धुळ खात पडलेली असते.
दरम्यान, नुकतेच सप्टेंबर महिन्यात सणसरजवळ कालवा फुटून पुन्हा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. घरांत पाणी शिरले, उभ्या पिकांचा चुराडा झाला. त्याचे पंचनामे तातडीने सुरू झाले. पण उन्हाळ्यातील अवकाळी पावसाचे पंचनामे झाले असूनसुद्धा, भरपाईचे वाटप अद्याप ही कागदावरच असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांचा सवाल सरळ आहे – “आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळत नाहीत, मग पंचनाम्यांचा तमाशा कशासाठी? आम्ही चार महिने वाट पाहतोय, पण आमच्या खिशात आजही शून्य आहे. सरकार फक्त फोटो काढायला आणि फाईल्स भरायला आमच्या बांधावर येतं का?”
हा दिरंगाईचा कारभार पाहून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप वाढत आहे. हंगाम सुरू होऊन नवे खर्च डोक्यावर आहेत, बँकांचे हप्ते बाकी आहेत, सावकारांच्या जाचक वसुल्या सुरू आहेत. आणि दुसरीकडे शासन मात्र निव्वळ मौनव्रत पाळून आहे.
“पंचनामे दाखवून ‘जत्रा’ उरकायची, पण भरपाई द्यायची नाही – हा सरकारचा खेळ शेतकऱ्यांना आता कळाय लागलाय.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 105











