जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.२४ : इंदापूर तालुक्यातील निरगुडे परिसर पुन्हा एकदा वाहतुकीच्या अडचणीत सापडला आहे. दिनांक १५ सष्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे निरगुडे – कळस या मुख्य पाणंद रस्त्यावरील ओढ्याचा पुल झालेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या पुलामुळे निरगुडे व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीत जाणे, तसेच गावोगावची दळणवळण व्यवस्था सुरळीत ठेवणे शक्य होत होते. पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना पिकांची देखभाल, जनावरांची सोय, तसेच दैनंदिन जीवनासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वी उन्हाळयातील अवकाळी पावसाने वाहून गेल्याने तात्पुरती दुरुस्ती करून पुल चालू ठेवला होता, मात्र यंदाच्या अवकाळी पावसाने हा उपाय पुन्हा धुळीस मिळाला. या ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने शेतकरी व ग्रामस्थ अक्षरशः अडकून पडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे भगवान बापु खारतोडे (मु. पो. निरगुडे, ता. इंदापूर) यांनी प्रशासनाला निवेदन देऊन वाहून गेलेल्या पुलाजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात तहसीलदार, प्रांताधिकारी, तसेच जिल्हाधिकारी यांना पुलाची तातडीने दुरुस्ती करून नवीन मजबूत पुल उभारण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “पुलामुळेच शेतकऱ्यांचा जीवनमानाशी थेट संबंध आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आम्ही महात्मा गांधी जयंती ( २ ऑक्टोंबर ) रोजी उपोषणाला बसणार,” असा इशारा खारतोडे यांनी प्रशासनाला दिला आहे.
ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, वाहून गेलेला हा पुल केवळ दोन्ही गांवाच्या दळणवळणाचीच नाही तर जनजीवनाची शाश्वती ठरतोय, आता प्रशासन तातडीने यामध्ये लक्ष घालते का, की शेतकऱ्यांच्या उपोषणानंतरच हालचाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 198










