जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
नागपूर – महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या वार्षिक आमसभेत घेण्यात आलेल्या ठरावानुसार इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावचे सुपुत्र श्री.किरण पवार यांची छाननी समिती संचालक सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विजय टी. डांगरे व सरचिटणीस प्रा. निलेश जगताप यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संस्थेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील व्हॉलीबॉल खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी छाननी समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या समितीच्या कार्यातून खेळाडूंना अनेक संधी मिळवून देत, राज्यातल्या स्पर्धात्मक वातावरणाला यामुळे नवी चालना मिळणार आहे. पवार यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारून महाराष्ट्र व्हॉलीबॉलला एक वेगळे स्थान मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
व्हॉलीबॉल हा महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय असलेला खेळ आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील अनेक खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. अशा पार्श्वभूमीवर छाननी समिती संचालक म्हणून पवार यांच्या निवडीमुळे असोसिएशनच्या धोरणांना नवे बळ मिळणार आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विजय डांगरे यांनी पत्रात म्हटले आहे की, “आपल्या पदाच्या माध्यमातून आपण व्हॉलीबॉल खेळाडूंसाठी संधीची नवी दारे उघडालं, याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. महाराष्ट्र व्हॉलीबॉलच्या विकासासाठी आपण दिलेला हातभार नक्कीच महत्त्वाचा ठरेल.”
दरम्यान, असोसिएशनचे मुख्य संरक्षक म्हणून केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांचे मार्गदर्शनही संस्थेला वेळोवेळी लाभत असल्याने राज्यातल्या व्हॉलीबॉलला अधिक व्यापक दिशा मिळत आहे.
पवार यांच्या निवडीमुळे राज्यातील व्हॉलीबॉल खेळाडू व चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या आगामी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -७५८८६२२३६३
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 184











