जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
जालना, ता.२७ : मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे, या ठाम मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आज अंतरवाली सराटी येथून लाखो मराठा समाज बांधवांसह त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. सकाळी दहा वाजता झालेल्या सभा-संमेलनात जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संबोधित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला.
जरांगे पाटील म्हणाले, “काल लातूरमध्ये एका मराठा तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. हे थांबवा! आत्महत्या करून आपण काही मिळवणार नाही. गॅझेट काढलं आहे, तरीसुद्धा सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांचा संयम आता ढासळू देऊ नका. मराठी आणि कुणबी एकच आहेत, हे लक्षात ठेवा!”
आंदोलनादरम्यान आक्रमक होत त्यांनी स्पष्ट इशारा दिला – “मराठा आरक्षणासाठी मी माझे बलिदान द्यायला तयार आहे. मुंबईत आल्यावर मला गोळ्या झाडा. पण गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या! आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्यामुळे झाल्या आहेत, त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच आहात.”
त्याचबरोबर आंदोलकांना शिस्त पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. “आजपासून कुणीही आत्महत्येचा प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून आरक्षण मिळवायचं आहे. शांततेचे आंदोलन कुणीही रोखू शकत नाही. सात-आठ टप्प्यात आंदोलन होईल, पण कुणीही दगडफेक-जाळपोळ करायची नाही. आपल्याला निर्णायक लढाई लढायची आहे.”
आता मराठा समाजाच्या नजरा २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे लागल्या आहेत. कारण या दिवशी जरांगे पाटील आणि त्यांचे लाखो समर्थक मुंबईतील आझाद मैदानात दाखल होणार आहेत. तिथेच आरक्षणाच्या लढ्याला निर्णायक टप्पा मिळणार आहे. राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर उभारले जात असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्राचे राजकारण तापणार यात तीळमात्र शंका नाही.
???? मराठा समाजाचा संयम आता सुटत चालला आहे आणि जरांगे पाटील यांनी दिलेला “मुंबईत मला गोळ्या झाडा, पण आरक्षण द्या!” हा इशारा सरकारला मोठ्या राजकीय वादळाची चाहूल देतोय.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 209










