शिरवळमध्ये गणरायाच्या स्वागताला पारंपरिक जल्लोषाचा उत्सव, पोलिसांचा चोख बंदोबस्त!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
शिरवळ, ता.२७ │ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असताना शिरवळ शहरातही गणरायाच्या स्वागताला भव्य व पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या. गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी शिरवळ पोलिसांनी बाजारपेठेसह प्रमुख मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध वातावरणात, पण उत्साहाच्या उन्मेषात या मिरवणुका संपन्न झाल्या.
शहरातील भोईराज तरूण मंडळ, केदारेश्वर तरूण मंडळ, भैरवनाथ तरूण मंडळ, बाजारपेठ तरूण मंडळ, दिग्विजय तरूण मंडळ, अविष्कार तरूण मंडळ, सत्यजोत तरूण मंडळ , बाल गणेश मित्र मंडळ, किशोर गणेश मंडळ, आदी प्रमुख मंडळांनी आपापल्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने केली. विशेष म्हणजे यंदा अनेक मंडळांनी डिजेला बगल देत पारंपरिक वाद्यांचा आधार घेतला. ढोल-ताशे, लेझीम, बॅन्जो, सनई, चौघडे यांच्या गजरात, तर फटाके व तोफांच्या दणक्यात वातावरण दुमदुमून गेले.
मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांच्या तालावर युवकांनी ठेका धरला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. अनेकांनी फुलांच्या उधळणीतून बाप्पांचे स्वागत केले. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने फिरून निर्धारित ठिकाणी येऊन विसावली. त्यानंतर मंडपात मूर्तीचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रद्धाळूंच्या “गणपती बाप्पा मोरया” च्या गजराने वातावरण दुमदुमून गेले.
दरम्यान, मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडावी यासाठी शिरवळ पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. बाजारपेठेतील प्रमुख चौकात तसेच मिरवणुकीच्या मार्गावर अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहतुकीची विशेष व्यवस्था करून कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात आली.
गणरायाच्या आगमनाने शिरवळ शहरात भक्तिभाव, उत्साह आणि ऐक्याचा सुंदर संगम पहायला मिळाला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, शिस्तबद्ध वातावरणात झालेल्या या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीने गणेशोत्सवाची सुरुवात ऐतिहासिक आणि मंगलमय ठरली.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें