जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर ता.१० :- राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवी नात्यांचा सन्मान करणारे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे केवळ जनतेचे प्रतिनिधी नाहीत, तर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य बहिणींचे ‘मोठा भाऊ’ आहेत. संकटात धावून जाणे, मदतीचा हात पुढे करणे आणि आपुलकीने साथ देणे—या त्यांच्या स्वभावामुळे बहिणींच्या मनात त्यांच्याविषयीचा स्नेह वर्षानुवर्षे वाढतच गेला आहे.
याच बंधाची साक्ष रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त पुन्हा मिळाली. इंदापूर येथील मंत्री भरणे यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच राखी बांधण्यासाठी बहिणींची रांग लागली होती. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या बहिणींनी प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेली राखी त्यांच्या हातावर बांधली आणि त्यांच्या दीर्घायुष्य व यशासाठी मंगलकामना केल्या.
या क्षणी वातावरण भावनांनी ओथंबलेले होते. अनेक बहिणींनी मनोगत व्यक्त करताना, “भरणे मामा हे आमच्यासाठी केवळ मंत्री नाहीत, तर संकटात साथ देणारे खरे संरक्षक आहेत,” असे सांगितले. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाची झळाळी होती.
मंत्री भरणे यांनीही बहिणींना आशीर्वाद देत, “तुमच्या सुरक्षिततेसाठी, सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी मी सदैव उभा राहीन,” असा विश्वास दिला. त्यांचा हा शब्द बहिणींसाठी नुसता दिलासा नव्हे, तर नात्याच्या बंधनाला अधिक दृढ करणारा ठरला.
रक्षाबंधनाच्या या औचित्याने बहीण-भावाच्या नात्याचा गोडवा आणखी वाढला. हा भावनिक स्नेहमेळावा इंदापूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यात आणि राज्यातील अनेक भागांत चर्चेचा विषय ठरला. ‘मोठा भाऊ’ म्हणून भरणे यांच्यावर बहिणींचा असलेला विश्वास आणि आपुलकी याची ही जिवंत साक्ष होती.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह