जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.५: इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथे अवादा (Avaada) कंपनीच्या सौर वाहिनी प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या बांधावरून जाऊन परस्पर काम सुरू केल्याचा आरोप कंपनीवर होत आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून सौर वाहिनी टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर केला जात आहे. मात्र, यासाठी संबंधित शेतकऱ्यांची पूर्वसंमती न घेतल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. काही शेतकऱ्यांनी कामाला विरोध करत बांधावर सुरू असलेले काम थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाद अधिक चिघळला.
यामध्ये आणखी एक गंभीर आरोप पुढे आला असून, अवादा कंपनीकडून पोलिस संरक्षणात वाहिनीचे काम करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून दबाव टाकून काम सुरू केले असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणात बारामतीचे निवृत्त नायब तहसीलदारांकडून हस्तक्षेप करत संबंधित काम ‘सरकारी काम’ असल्याचे सांगत शेतकऱ्यांना अडवल्याचा आरोप होत आहे. खासगी कंपनीच्या कामाला सरकारी स्वरूप देत शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“आमच्या जमिनीवर आमची पुर्व परवानगी न घेता काम सुरू आहे. विरोध केला तर पोलिसांच्या उपस्थितीत आम्हालाच अडवले जातेय. हा अन्याय सहन करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, अन्यायग्रस्त शेतकरी एकवटले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात इंदापूर तहसीलदार आणि बारामती प्रांत अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सौर प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप होत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शेटफळगडे येथील हा वाद आता इंदापूर तालुक्याच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 97,267









