जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे, ता.४: गुंटूर (आंध्रप्रदेश) एनटीपीसी १० वर्षांखालील राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा तिरंदाज प्रज्वल दाभाडे याने दमदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. २८ ते ३० मार्च २०२६ दरम्यान गुंटूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात प्रज्वलने आपली अचूकता आणि मानसिक ताकद सिद्ध करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रज्वलने स्पर्धेतील ‘कंपाउंड’ प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली. एलिमिनेशन फेरीत त्याने विविध राज्यांतील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध झुंज देत सातत्यपूर्ण आणि स्थिर खेळ दाखवला. प्रत्येक फेरीत लक्ष्यभेदनाची अचूकता राखत त्याने कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेतही प्रज्वलने अव्वल क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्तरासाठी पात्रता मिळवली होती. त्या यशाची पुनरावृत्ती करत त्याने राष्ट्रीय स्पर्धेतही आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे.
या यशामागे त्याच्या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, पालकांचे सातत्यपूर्ण पाठबळ आणि प्रज्वलची जिद्द व कठोर सराव महत्त्वाचा ठरला आहे. कमी वयातच त्याने दाखवलेली एकाग्रता आणि खेळावरील निष्ठा ही भविष्यातील मोठ्या यशाची नांदी मानली जात आहे.
प्रज्वल दाभाडेची ही कामगिरी केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर इंदापूर तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. भविष्यातही तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अशीच चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 90,105









