चौघांविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल | लग्नासाठी अपहरण करून जीवे मारण्याची दिली होती धमकी
भिगवण, ता.५ : पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथील बहुचर्चित तरुणीच्या अपहरण प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. पिडीत मुलीवर झहीर शेख याने लैंगिक अत्याचार केल्याचे आणि बळजबरीने लग्न करण्यासाठी अपहरण केल्याचे स्पष्ट झाले आहे. अपहरण केल्यानंतर धाक दाखवून गोमांस खाऊ घालून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत व्हिडिओ काढल्याचे आणि सह्या घेतल्याची फिर्याद पिडीत मुलीने दिली आहे. फिर्यादीनुसार चार जणांविरूध्द पोक्सो आणि अन्य कलमान्वये गुन्हा झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी एका तरुणीचे अपहरण झाले होते. २२ फेब्रुवारीला तिचं लग्न ठरले होते; त्यासाठी ती, तिची विधवा आई आणि भाऊ सोने खरेदीसाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर अझर शेख याच्या मदतीने झहीर हरुण शेख व त्याचा भाऊ आयान हरुण शेख (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड) यांनी तरुणीला ओढून टेम्पोत बसवण्याचा प्रयत्न केला. आईने विरोध केला असता त्यांच्या मांडीत दांडका मारून आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तरूणीचे अपहरण करण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणात ४ एप्रिल २०२६ रोजी पीडितेच्या फिर्यादीनुसार, झहीर शेख याने बारामती मधील एक हॅाटेलात ती अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार केला. त्या अत्याचाराचे फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन त्याने वारंवार अत्याचार केला. लग्न न केल्यास आई-भावाला जीवे मारण्याची आणि स्वतःला इजा करण्याची धमकीही त्याने दिली होती. खंडाळा (जि. सातारा) मार्गे बारामतीला नेवून जबरदस्तीने “आम्ही लग्न केले असून स्वेच्छेने आले ” असं व्हिडिओत सांगण्यास भाग पाडले आणि स्टॅम्प पेपरवर धाक दाखवून सह्या घेतल्या.
१९ फेब्रुवारीला आई-भावाला मारण्याची धमकी देऊन बारामती पोलिसात अझर व झहीरच्या सांगण्यानुसार जबाब दिला. परंतु त्यानंतर सुधारगृहात गेल्यानंतर आणि न्यायालयाच्या आदेशाने नातेवाईकांच्या ताब्यात आल्यानंतर पीडितेने घरच्यांना घटनाक्रम सांगितला.
त्यानुसार पीडितेने तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, अपहरण, गोमांस खाण्यास भाग पाडणे, टिकली काढणे, इच्छेविरुद्ध व्हिडिओ बाईट देणे, धाकदपटशाने सह्या घेणे याबाबत बारामती पोलिसांना जबाब दिला. भिगवण पोलिस ठाण्यात ४ एप्रिल २०२६ रोजी झहीर हरुण शेख, आयान हरुण शेख, अझर शौकत शेख (तिघे रा. स्वामी चिंचोली) आणि सद्दाम शेख (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
भिगवण पोलीस स्टेशन मध्ये गु. रजि. नंबर. ३६/२०२६ अन्वये झहीर हरुण शेख, आयान हरुण शेख, अझर शौकत शेख (तिघे रा. स्वामी चिंचोली) आणि सद्दाम शेख (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १३७ (२), ३०९ (४), ३(५), ६४ (२) (आय) (एम), ७४, ७५(२), ३५१ (२), सह बालकांचे लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनियम ( पोक्सो) सन २०१२ चे कलम. ४, ६, ८, १२ अन्वये चौघांवर गुन्हा दाखल आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह









