बारामती : व्हिडिओ पोस्टच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोन मुख्य आरोपी अटकेत
जनसंघर्ष न्युज नेटवर्क
बारामती, ता.२२ :- तांदुळवाडी (ता. बारामती) येथे धार्मिक कार्यक्रमात जेवण वाढत असताना काढलेल्या व्हिडिओच्या पोस्टवरून निर्माण झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तातडीची पावले उचलत दोन मुख्य आरोपींना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सार्थक लक्ष्मण अंबुरे (वय १८, रा. तांदुळवाडी) हा भैरवनाथ मंदिरातील पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांसाठी जेवण वाढत होता. त्या वेळी गावातील एका व्यक्तीने त्याचा मोबाईलवर व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. हा व्हिडिओ हटवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादानंतर पप्पू शितोळे याने कामाच्या बहाण्याने सार्थकला मंदिराच्या मागील बाजूस बोलावून घेतले. तेथे आधीच गणेश सुभाष जाधव, अभिजीत शेळके, अरुण जाधव व अन्य काही जण उपस्थित होते. त्यांनी शिवीगाळ करत सार्थकला जबरदस्तीने यश शितोळे यांच्या घराकडे नेले. तेथे त्याला खाली पाडून गज तसेच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाणीच्या वेळी गणेश जाधव याने गचुंडे धरून पिस्तूल काढत जीवे मारण्याची धमकी दिली, तर पप्पू शितोळे याने हा प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात सार्थकच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली.
जीवाला धोका असल्याने त्याने तत्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी वेदना वाढल्यानंतर तो आईसह बारामती तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी गणेश सुभाष जाधव (वय ३४) आणि पप्पू शितोळे (वय ३४, रा. तांदुळवाडी) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
याच घटनेदरम्यान एका अल्पवयीन मुलाच्या डोक्यात कोयत्याचा वार झाल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकरणी सार्थक अंभोरे, आकाश आंबोरे, बापू अंभोरे, पोपट अंभोरे व लखन अंभोरे (सर्व रा. तांदुळवाडी) यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, दादा दराडे व आफ्रिन शेख यांच्या पथकाने केली.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 30,260









