जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
बारामती, ता.२० : पवार स्पोर्ट्स अकॅडमी, बारामती येथील खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि राजस्थान व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९ वी कुमार गट मुली राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ साठी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात अकॅडमीतील साक्षी साळुंखे, समृद्धी चांदगुडे, वर्षा काळे आणि प्रणाली पवार यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा राजस्थानमधील पिलानी (जिल्हा झुंझुनू) येथे होणार आहे.
पवार स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये दमदार खेळ दाखवत त्यांनी निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
या निवडीमुळे बारामतीसह परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील मुलींना योग्य संधी, आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि आत्मविश्वास दिल्यास त्या राष्ट्रीय पातळीवरही यशस्वी ठरू शकतात, हे या निवडीने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
निवड झालेल्या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय पालक, प्रशिक्षक किरण पवार, अकॅडमीतील सहकारी खेळाडू आणि मार्गदर्शकांना दिले आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून उत्तम कामगिरी करून राज्याचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
पवार स्पोर्ट्स अकॅडमीच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात आणखी खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 32,191










