जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, (प्रतिनिधी) ता.११ : निरगुडे सज्जासाठी कायमस्वरूपी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता भगवान बापू खारतोडे यांनी निवेदनाव्दारे उपोषण इशाऱ्यानंतर अखेर प्रशासन जागं झाले. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जीवन बनसोडे यांनी तात्काळ दखल घेत निरगुडे येथे नव्याने नियुक्ती केलेल्या तलाठी श्री. किशोर राऊत यांची नियुक्ती आदेशाद्वारे जाहीर केली. या नियुक्तीमुळे गेल्या काही महिन्यांपासून महसूल कामकाजात अडथळे येत असलेल्या निरगुडे गावाला आता दिलासा मिळणार आहे.
सदर आदेशानुसार, पोंधवडी येथे कार्यरत ग्राम महसूल अधिकारी श्री. महेश कुलकर्णी यांच्याकडे निरगुडे सज्जाचा अतिरीक्त कार्यभार होता. आता श्री. किशोर राऊत यांची अधिकृत नेमणूक झाल्याने त्यांनी पुढील एक महिना श्री. कुलकर्णी यांच्याकडून ऑनलाईन ७/१२ तसेच इतर महसूल कामकाजाचे प्रशिक्षण घ्यावे, असे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर राऊत यांच्या स्वाधीन निरगुडे सज्जाचा मूळ कार्यभार सोपविण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्याच्या उपोषण इशाऱ्याला मिळाले यश
निरगुडे गावातील नागरिकांना गेल्या काही काळापासून ७/१२ उतारा, फेरफार, नामांतर, शेत नोंदी, प्रलंबित अर्ज अशा अनेक महसूल कामांसाठी वारंवार तहसील कार्यालय किंवा इतर सज्जांवर धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे त्रस्त नागरिकांच्या समस्या मिटविण्यासाठी सा. कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसिल कार्यालयाला दिले होते. या उपोषणाची तहसीलदारांनी तत्काळ दखल घेत सकारात्मक निर्णय घेतल्याची माहिती मिळाली.
प्रशासनाचा कडक इशारा
सदरील आदेशामध्ये कोणत्याही प्रकारची टाळाटाळ, हलगर्जी किंवा कार्यात ढिलाई आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तहसीलदारांनी दिला आहे. नियुक्तीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयासही अवगत करण्यात आले आहे.
निरगुडे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी शासन प्रशासनाचे तसेच सामाजिक कार्यकर्ता भगवान खारतोडे यांचे आभार मानले असून आता महसूल कामकाज सुरळीत होण्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह










