जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२३ : इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाणीप्रश्नावर पुन्हा आवाज उठविला आहे. “कृषीमंत्री आणि सत्ताधारी नेते फक्त गोड बोलतात, पण प्रत्यक्ष कृती मात्र दिसत नाही,” अशी टीका खडकवासला प्रकल्पग्रस्त शेतकरी श्री. विजय गावडे यांनी केली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, “फडणवीस साहेबांनी ‘सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू’ असं जाहीर केलं, पण सत्तेत आल्यानंतर सर्वच गोड बोलून वेळ मारून नेण्याची नीति घेतली. इंदापूर तालुक्याचंही तेच झालं. निवडणुकीत खडकवासला कालवा बारमाही करू, पर्यायी व्यवस्था निर्माण करू असं सांगून मतं घेतली. पण सत्तेत गेल्यावर पाणीप्रश्न विसरले.”
गावडे पुढे म्हणतात, “पहिल्यांदा इंदापूरकरांनी विश्वास दाखवून संधी दिली, दुसऱ्या टर्मला प्रयत्न झाले पण आपल्या पक्षातीलच मंत्र्यांनी योजना रद्द केली. तिसऱ्या टर्मला पत्रकारांसमोर कागदपत्रे दाखवून सहानुभूती मिळवली, मंत्रीपद मिळालं; पण आजतागायत या प्रश्नावर ठोस निर्णय झालेला नाही.”
“आपण या विषयावर बोलणं टाळताय, शेतकऱ्यांपासून तोंड चुकवताय. जानाई-शिरसाईसाठी पाणी गेलं हे सांगण्याचं धैर्य नाही. ठाम भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत खडकवासला लाभधारक शेतकरीही आपली ठाम भूमिका घेतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
गावडे यांनी शेवटी टोला लगावला – “साहेब, लकी शर्ट नाही, लकी तर इंदापूरचा पाणीप्रश्न आणि खडकवासला लाभधारक शेतकरी आहेत; मतांचे आकडे पाहा!”
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 4,223










