जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२२ : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे ग्रामदैवत यशवंतराय देवस्थानाच्या पारंपरिक यात्रेनिमित्त माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मा. हर्षवर्धन पाटील यांनी देवस्थानास भेट देत यशवंतरायाचे दर्शन घेतले. यात्रेच्या पारंपरिक सोहळ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असून, पाटील यांच्या आगमनाने या सोहळ्याला एक वेगळे औचित्य प्राप्त झाले.
पाडव्यापासून सुरू झालेली ही पारंपरिक यशवंतराय यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “जय यशवंतराय” च्या घोषात गावभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या दरम्यान मा. पाटील यांनी देवस्थानाच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा-अर्चा केली आणि ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतले. देवस्थान समितीने त्यांचा सत्कार करून स्वागत केले. यात्रेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व म्हटले, “यशवंतरायाच्या कृपेने म्हसोबावाडी व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी मनापासून प्रार्थना आहे.”
यात्रा व्यवस्थापन, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांची पाहणी करताना त्यांनी देवस्थान समितीच्या कार्याचे कौतुक केले. भाविकांच्या सोयीसाठी उभारलेल्या सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी इंदापूर तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस सचिन चांदगुडे, सरपंच, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यात्रेनिमित्त दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, देवदर्शनानंतर मा. हर्षवर्धन पाटील यांनी कै. प्रमोद चांदगुडे यांचे सुपुत्र कै. पृथ्वीराज चांदगुडे यांच्या अकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी त्यांनी कुटुंबाला धीर देत म्हटले, की “मी आपल्या सुखदुःखात सदैव पाठिशी खंबीरपणे उभा आहे.”
यात्रेदरम्यान गावात उत्साह, भक्ती आणि एकोपा यांचे दर्शन घडले. पाटील यांच्या भेटीमुळे संपूर्ण सोहळ्याला नवा उत्साह लाभला, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 3,811










