जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती तालुका, ता.२३ | नवरात्र उत्सवाच्या दिवशी वंजारवाडी गावात गुंडांनी दहशत माजवत दत्त मंदिरासमोर पाच जणांवर कोयत्याने सपासप वार केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी अमोल अण्णा चौधर यांच्या तक्रारीवरून ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर, अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने, शुभम वाघ आणि तेजस हजारे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
घटना कशी घडली?
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गावातील नागरिक देवीची ज्योत घेऊन दत्त मंदिरासमोर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पूजा सुरू करत होते. त्याचवेळी चारचाकीतून आलेल्या आरोपींनी लोखंडी कोयते व चाकू काढत अमोल चौधर व त्यांच्या भावंडांवर जीवघेणा हल्ला केला.
या रक्तरंजित हल्ल्यात सुनिल गोरख चौधर, अमोल अण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत शुभम वाघ, अली मुजावर व ओम अर्जुन कुचेकर या तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपी फरार आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज पाटील पुढील तपास करत आहेत.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 335










