जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा, ता.१८ | सातारा जिल्ह्यातील पांचगणी पोलीस ठाण्याने महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी (भा.पो.से.) यांनी दिलेल्या प्रशंसापत्रातून या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी अलीकडेच जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला होता. विशेषतः महिलांविषयीच्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते. या सूचनेनुसार पांचगणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गु.र.नं. २०५/२०२५, भा.न्या.सं.क. ७४, ३५१(२), ३५१(३) या गुन्ह्याचा तपास पोलीसांनी अवघ्या दोन दिवसांत पूर्ण केला.
महिलांवरील अत्याचाराच्या या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून २५ ऑगस्ट २०२५ रोजी कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. एवढ्याच अल्पावधीत झालेल्या या कार्यवाहीमुळे कोर्ट केस क्र. ३१२५/२०२५ दाखल झाला आहे. प्रभारी अधिकारी म्हणून सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ दखल घेऊन तपास अधिकाऱ्याला योग्य मार्गदर्शन केले, ज्यामुळे प्रकरण जलदगतीने न्यायालयीन टप्प्यावर पोहोचले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलीप पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की भविष्यातही पोलीस अधिकारी व कर्मचारी अशाच तत्परतेने काम करून जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवतील.
पांचगणी पोलीस ठाण्याची ही कामगिरी महिला सुरक्षेप्रती बांधिलकीचे आणि तत्परतेचे प्रतीक ठरली असून, या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 134










