अजितदादांची ‘पावर’ कायम! राष्ट्रवादी १४८ जागांसह राज्यात दुसरा क्रमांक; पुणे जिल्हा परिषदेत वर्चस्व अबाधित
प्रचार सभा टाळूनही सहानुभूतीची लाट; भाजप १९८ जागांसह अव्वल, शिंदेसेना तिसऱ्या स्थानी
जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे, ता.९ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने १४८ जागांवर विजय मिळवत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जोरदार पुनरागमन नोंदवले आहे. प्रचार सभा व रॅली टाळूनही मिळालेल्या या यशामुळे अजितदादांविषयीची भावनिक लाट मतपेटीत स्पष्टपणे उमटल्याचे चित्र आहे.
भाजपने १९८ जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने १३९ जागांवर विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले. ठाकरेंच्या शिवसेनेला ३७, काँग्रेसला ४८, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला २१, मनसेला २ आणि इतरांना ३८ जागांवर समाधान मानावे लागले. काही ठिकाणी मतमोजणी सुरू असून अंतिम चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीने प्रचाराची आक्रमकता कमी ठेवत संयमी भूमिका घेतली होती. तरीही राज्यभरातून पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळाले. अनेक विजयी उमेदवारांनी निकाल जाहीर होताच अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत अश्रूंनीच आनंद व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवदीचे वर्चस्व कायम
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सर्वाधिक ४७ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेने ठाम पाऊल टाकले आहे. भाजपला ९, शिंदेसेनेला ४, शिवसेनेला ६ तर शरद पवार गटाला केवळ १ जागा मिळाली. बारामती-इंदापूर परिसरात राष्ट्रवादीची पकड कायम असल्याचे निकालातून अधोरेखित झाले.
भिगवण व शेटफळगढे परिसरात—मतदानाचा उत्साहही लक्षणीय होता (एकूण सुमारे ६५.६७% मतदान), आणि त्याचा थेट परिणाम हा निकालावर दिसून आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राजकीय समीकरणांना नवी दिशा
प्रचाराशिवाय मिळालेले हे यश आगामी स्थानिक सत्तासमीकरणांना नवे वळण देणारे ठरणार आहे. सहानुभूती, संघटनबांधणी आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव या तिन्ही घटकांचा संगम राष्ट्रवादीच्या कामगिरीत दिसून आला. अंतिम निकालानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होणार असून राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींची चाहूल लागली आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 80,099









