जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.१ :- इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांतील जलजीवन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे व भ्रष्टाचार झाल्याचे नुकतेच समोर आले आहे त्यातचं काही योजना चौकशीचा फेऱ्यात अडकल्या आहेत व काही अडकणार आहेत त्यामध्ये आता याच तालुक्यातील निरगुडे गावातील जलजीवन योजनेचा कारभार अक्षरशः तीन तिघाडा अनं काम बिघाडा ठरला असल्याचा गंभीर आरोप होत असून, ही योजना अजून पूर्णत्वास न पोहोचताच तब्बल ८९ लाख रुपयांची बिले ठेकेदारांना अदा झाल्याचा धडकी भरवणारा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ता भगवान खारतोडे यांनी केला आहे. एकाच विहिरीवरून सलग तिसरी जलजीवन योजना मंजूर होऊनही आजपर्यंत गावकऱ्यांना शाश्वत पाणीपुरवठा मिळालेला नाही. उलट चौकशी सुरू झाल्यापासून कामच ठप्प झाले आहे.
योजनेतील अनियमितता, ठेकेदार–अधिकारी संगनमत आणि अपूर्ण कामांना दिलेली लाखो रुपयांची बिले यामुळे संतप्त झालेल्या भगवान खारतोडे यांनी नुकतेच पुणे जिल्हा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याकडे आत्मदहनाचे निवेदन देत प्रशासनाला हादरा दिला होता.
ऑगस्ट २०२५ मध्ये या योजनेतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी शिरूर पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये अधिकारी पवार यांनी चौकशी अहवाल पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी विकास पाथरवट यांना सादर केला. मात्र दोन महिने उलटून गेले तरी हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या पटलावर पोहोचलेलाच नाही, ही बाब अधिकचा संशय निर्माण करणारी असल्याचे खारतोडे यांनी स्पष्ट केले.
“दोन महिने अहवाल पटलावर न जाणे म्हणजे चौकशीला कोण अडथळा आणत आहे? कोण कोणाला वाचवत आहे? गावाच्या पाण्याच्या प्रश्नावर असा खेळखंडोबा कसा काय सहन करायचा?” असा थेट आरोप खारतोडे यांनी करत अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत संशयास्पदरीत्या असल्याचे यावेळी सांगितले.
एकाच विहिरीवरून तीन योजना, अपूर्ण कामांना लाखोंची बिले, आणि आता चौकशीचा अहवालही जाणीवपूर्वक दाबून ठेवण्याचा प्रयत्न—या सर्व प्रकरणामुळे निरगुडे गावातील जलजीवन योजनेत प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे.
गावकऱ्यांची पाणीटंचाई कायम असताना योजनेच्या नावाखाली कोट्यवधींचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप जनसंघर्ष शैलीत पुन्हा एकदा समोर आला आहे. आता या प्रकरणात सीईओंच्या पातळीवर कारवाई होणार का, की चौकशी अहवालाला कायमस्वरूपी कात्रजचा घाट दाखवला तर,जाणार नाही ना? असा संशय येेथील नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 24,355










