जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२१:- कळस (ता. इंदापूर) येथील जीवन प्राधिकरणाची तब्बल ३२ कोटींची पाणीपुरवठा योजना आता चौकशीच्या विळख्यात सापडली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून स्वतंत्र चौकशी आदेशित करत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निरगुडे (ता. इंदापूर) येथील भगवान खारतोडे यांनी या योजनेतील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि बिलांचा गैरव्यवहार याबाबत अधीक्षक अभियंत्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

खारतोडे यांच्या मते, कळस गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेली ३२ कोटींची योजना एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवण्यात आली. मात्र या कंपनीने केलेले काम इस्टिमेटच्या फक्त नावापुरते राहिले. पाणी साठवण तलावापासून पंप हाउसपर्यंत सर्वच कामातून निकृष्ट सामग्रीचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ठेकेदाराने बिरंगुडवाडी, पिलेवाडी आणि गोसावी वाडी येथे ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत केलेली कामेही अशीच निकृष्ट असल्याचेही त्यांनी नोंदविले.

चौकशी पत्राची प्रत देतेवेळी छायाचित्र
लासुर्णे येथील कालव्यानजीक खोदलेली विहीर आणि तिच्याशी जोडलेली जलवाहिनीही दर्जाहीन स्वरूपात उभारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‘हर घर जल’ योजनेची आणि जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी एकाच चारित असताना, ठेकेदाराने मात्र दोन स्वतंत्र बिलांनी शासनाला चुना लावल्याचा गंभीर आरोप खारतोडे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कळसच्या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता घडली असून, यामागे ठेकेदारांसह काही अधिकाऱ्यांचा संगनमताचा संशय आहे.
दरम्यान, खा. सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर दौऱ्यादरम्यान खारतोडे यांनी प्रत्यक्ष भेटून या गैरकारभाराची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच पाठपुराव्यानंतर वरिष्ठ स्तरावर चौकशीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
तक्रारीत खारतोडे यांनी सप्टेंबर महिन्यात मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर विभागाने तातडीने त्यांना लेखी आश्वासन देऊन चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
कळसच्या बहुचर्चित ३२ कोटींच्या योजनेत नेमके काय चालले होते? कोण-कोण जबाबदार? आणि किती रक्कम गडप झाली? या सर्वांची उत्तरे आता चौकशी अहवालातूनच मिळणार आहेत.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह










